संप ठेकेदारांचा, शिक्षा कर्मचाऱ्यांना
राजानंद मोरे
थकित बिलांची रक्कम पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) मिळाली नसल्याने बस पुरविणाऱ्या ठेकेदारांनी पुकारलेल्या संपाची शिक्षा पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. संपाच्या काळातील दीड ते दोन दिवसांची रजा कर्मचाऱ्यांच्या खात्यात लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीएमपीएमएलला भाडेतत्वावर बस पुरविणाऱ्या ठेकेदारांनी रविवारी (दि. ५) दुपारपासून अचानक संप पुकारला होता. हा संप सोमवारी (दि. ६) रात्री मागे घेण्यात आला. या संपामुळे पीएमपी प्रशासनाने थकीत बिलापोटीचे ६६ कोटी रुपये दिल्यानंतर माघार घेतली. दीड दिवसाच्या या संपाने ठेकेदार मालामाल झाले, पण पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मात्र मोठा दणका बसला आहे. ठेकेदारांच्या बसवर वाहक म्हणून नेमणूक असलेल्या कर्मचाऱ्यांची दीड ते दोन दिवसांची रजा लावली जाणार आहे. तर रजा शिल्लक नसलेल्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना या दिवसाचा पगारही दिला जाणार नाही. त्यामुळे संप एकाचा आणि शिक्षा दुसऱ्याला अशी स्थिती आहे.
पीएमपीच्या चार ठेकेदारांचे चार महिन्यांचे तब्बल ९९ कोटी रुपयांचे बिल थकले होते. मागील तीन-चार महिन्यांपासून पीएमपीकडून त्यांना भाडे देण्यात आले नव्हते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पीएमपीला पैसे न मिळाल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे रविवारी दुपारी ठेकेदारांनी संप पुकारला. त्यामुळे मार्गावरील सुमारे ९०७ बस अचानक थांबल्या. त्याचा लाखो प्रवाशांना फटका बसला. दोन्ही महापालिकांनी सोमवारी ९० कोटी रुपये प्रशासनाला दिले. त्यापैकी ६६ कोटी रुपये ठेकेदारांना दिले गेले. तर २४ कोटी महाराष्ट्र नॅचरल गॅल लिमिटेड (एमएनजीएल) या सीएनजी पुरवठादार कंपनीला देण्यात आले.
संपामध्ये ओलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाईम, अँथनी आणि हंसा हे चार ठेकेदार सहभागी होते. संपाच्या काळात केवळ पीएमपीच्या मालकीच्या सुमारे ७०० बसमधूनच पुणेकरांना दीड दिवस प्रवास करावा लागला. पीएमपीकडून ठेकेदारांना वाहक पुरविले जातात. पीएमपीकडे सध्या चार हजारांहून अधिक वाहक आहेत. त्यापैकी प्रत्येक शिफ्टला जवळपास एक हजार वाहकांची नियुक्ती केली जाते. त्यामध्ये रोजंदारीवरील कर्मचारीही आहेत. रोजंदारीवरील वाहकांना दरमहा दीड तर कायम वाहकांना दोन ते तीन रजा दिल्या जातात. संपामुळे या रजा वाया जाणार आहे. संपकाळातील कामावर हजर असूनही त्यांची रजा गृहित धरली जाणार आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याविषयी बोलताना एक कायम सेवेतील वाहक म्हणाला, ‘‘संपाच्या दिवशी मी सकाळी सव्वासहा वाजता कामावर हजर होतो. पण बस नसल्याने सुट्टी मांडण्यात आली. दुपारच्या सत्रातील वाहकांची तर दोन दिवसांची सुट्टी नोंदवण्यात आली. आता या सुट्ट्या रजेत वर्ग केल्या जातील. आम्ही कामावर हजर असूनही आमच्या रजा कमी होतील. एका महिन्यात मोजक्याच रजा असल्याने पुढील महिनाभर रजा न घेता काम करावे लागेल. काही कर्मचाऱ्यांच्या याआधीच एक-दोन सुट्ट्या झाल्या असतील तर त्यांच्या पुढील महिन्यातील रजा कमी होतील. रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना आधी सुट्ट्या संपल्या असतील तर त्यांच्या संपाच्या काळातील दिवसांचे वेतनच मिळणार नाही. आमची काहीही चूक नसताना हा भूर्दंड सहन करावा लागणार आहे.’’
‘‘संपामुळे कर्मचारी कामावर येऊनही त्यांना ड्युटी मिळाली नाही. यामध्ये त्यांची काहीच चूक नाही. ठेकेदारांनी मात्र संप करून पदरात पैसे पाडून घेतले. यातून कर्मचाऱ्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. त्यांची चूक नसताना रजा कमी होतील. काहींना त्या दिवसाचे वेतनच मिळणार नाही. त्याचप्रमाणे सध्या दहावी-बारावीच्याही परीक्षा सुरू आहेत. अशावेळी ठेकेदारांनी संप करून प्रवाशांना वेठीस धरले त्यामुळे त्यांच्या कठोर कारवाई करायला हवी. तर संबंधित कर्मचाऱ्यांनाही दिलासा द्यावा, अशी मागणी पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस सुनील नलावडे यांनी केली.