कडूस गावात शेणापासून उजळणार पथदिवे

खेड तालुक्यातील कडूस येथे राज्यातील पहिला ‘गोबरधन’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीला वीज प्राप्त होणार असून वर्षाला विजेसाठी होणाऱ्या ८ ते १० लाख रुपयांची बचत होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 1 Apr 2023
  • 07:41 am
कडूस गावात शेणापासून उजळणार पथदिवे

कडूस गावात शेणापासून उजळणार पथदिवे

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

खेड तालुक्यातील कडूस येथे राज्यातील पहिला ‘गोबरधन’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीला वीज प्राप्त होणार असून वर्षाला विजेसाठी होणाऱ्या ८ ते १० लाख रुपयांची बचत होणार आहे.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे, माजी जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, सरपंच शहनाज तुरूक, ग्रामसेवक बाळासाहेब माने आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची सुरुवात केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक प्रकल्प उभारण्यात येत असून यापूर्वी नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातही प्रकल्प उभारण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात कार्यान्वित होणारा हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे.

प्रकल्पासाठी जिल्ह्याला केंद्र सरकारकडून ५० लाख रुपये प्राप्त झाले होते. प्रकल्प उभारण्यासाठी खेड तालुक्यातील कडूस गावाची निवड करण्यात आली. परिसरात असणाऱ्या धाब्यावरील ओला कचरा, पशुधनाचे मलमूत्र आदींचा उपयोग करून या प्रकल्पातून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. गावातील पथदिव्यांसाठी ही वीज उपयोगात येणार असल्याने ग्रामपंचायतीचा खर्च कमी होऊन इतर विकासकामांसाठी अधिक खर्च करणे शक्य होणार आहे.

वीज निर्मितीनंतर प्राप्त होणारे कंपोस्ट खताचे पॅकिंग व ब्रँडिंग करून स्थानिक शेतकऱ्यांना ते स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळेदेखील ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळू शकेल. एकूणच वाया जाणाऱ्या परिसरातील कचऱ्यातून हा प्रकल्प चालविण्यात येणार असल्याने परिसर स्वच्छतेसाठीदेखील उपयुक्त ठरणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, "गोबरधन योजनेअंतर्गत राज्यात कार्यान्वित होणारा हा पहिला प्रकल्प आहे. हा प्रकल्प ग्रामपंचायतीला लाभदायक आणि ग्रामस्वच्छतेला पूरक ठरणार आहे.* 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story