‘विठ्ठल आणि बडवेंचा दाखला देणे बंद करा’
विजय चव्हाण
वर्षभर महाराष्ट्रात घडलेल्या अनेक राजकीय घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ वा जयंत पाटील यांनी ‘विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे’, ‘विठ्ठलाच्या दर्शनात बडवे मधे आले’ असा आशय व्यक्त करणारी वक्तव्ये केली आहेत. सातत्याने नकारात्मक अर्थाने बडव्यांचा उल्लेख केल्याने पंढरपूर तसेच परिसरातील बडवे समाज संतप्त झाला असून या राजकीय घडामोडींशी बडवे आणि श्री विठ्ठल यांचा कसलाही संबंध नसताना पुन्हा पुन्हा असे दाखले दिल्यास संबंधित राजकीय पक्षाला आणि संबंधित नेत्यांना आम्ही त्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशारा बडवे समाजाने दिली आहे.
अशा प्रकारे बडव्यांना कुप्रसिद्धी देण्याचे काम चालू आहे. त्यामुळे बडव्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सर्वच राजकीय पक्षांनी तत्काळ थांबवावे, या मागणीसाठी बडवे समाजातील युवकांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्णय एकमताने घेण्यात आला.
महाराष्ट्राच्या जनतेवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे. बडव्यांनी वारकऱ्यांना जो त्रास दिला, त्यातून त्यांची भावना झाली की, विठ्ठलाचे दर्शन घेताना आम्हाला बडवे त्रास देतात. म्हणून महाराष्ट्रात आपल्या नेत्याच्या आसपास असणारे लोक जे नेता आणि आपल्यात अडथळा ठरतात, त्यांना ‘बडवे’ म्हणण्यास सुरुवात झाली.
काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली होती, तेव्हा ते म्हणाले होते, “शिवसेनाप्रमुखच माझे दैवत आहे. मात्र, या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं असून त्यांच्या सोबत मला काम करायची इच्छा नाही. माझा लढा हा विठ्ठलाशी नाही; त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे.”
संजय शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात उद्धव ठाकरेंच्या बाजूला दोन बडवे आहेत, असा उल्लेख केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये शिवसेना सोडताना सांगितले होते की, बडव्यांमुळे त्यांना विठ्ठलाचे दर्शन होत नव्हते. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाविषयी जयंत पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ‘बडव्यांनी विठ्ठलाला घेरले आहे’, असे वक्तव्य केले. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात नेता आणि कार्यकर्ता यांच्यात दुरावा निर्माण करणाऱ्या व्यक्तींसाठी बडवे हा शब्द सूचकपणे वापरण्याची पद्धत रूढ झाली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.