चोरीला गेलेल्या कार चेन्नईतून जप्त, चार जणांना अटक
गेल्या चार महिन्यांपासून चोरीला जात असलेल्या कार पुणे ग्रामीण पोलिसांनी चेन्नई येथून जप्त केल्या आहेत. यासह पोलिसांनी तीस लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे. या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
राजा सुंदरराम, रवींद्र गोपीनाथ, यादवराज आणि आर सुधाकरण असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील चार महिन्यांपासून शिरूर शहरातून चारचाकी वाहने गायब होत होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता सर्व वाहने अहमदनगर मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आले होते.
या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर पुणे ग्रामिण पोलिसांनी चारचाकी पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला. यावेळी त्यांच्याकडून दोन स्विफ्ट डिझायर कार हस्तगत केल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रातून या गाड्या ज्यांच्याकडे पाठवल्या गेल्या त्यांचा अजूनही तपास सुरूच आहे. याबाबतचा अधिक तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत.