बिबट्यांची नसबंदी अन्नसाखळीच्या मुळावर
विजय चव्हाण
राज्यातील बिबट्यांची वाढती संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट्यांची नसबंदी करण्यासंदर्भात कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, हा निर्णय नैसर्गिक अन्नसाखळीला धोकादायक असल्याचा दावा करीत वन्यप्रेमींनी याला विरोध दर्शवला आहे.
‘‘बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय योग्य नाही. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना जेरबंद करावे, निवारा केंद्रात ठेवावे किंवा अन्य राज्यात नेऊन सोडावे,’’ अशी मागणी वन्यप्राणी प्रेमींनी सरकारकडे केली आहे. या संदर्भात जुन्नर येथील वन्यप्राणी अभ्यासक आणि लोकविश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन तोडकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच वनमंत्री यांना पत्र लिहून वरील मागणी केली आहे.
तोडकर यांच्या मते, ‘‘वन्यप्राण्यांची दिवसेंदिवस संख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्यांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी घेतलेला नसबंदीचा निर्णय चुकीचा तसेच भविष्यात अनिष्ट परिणाम करणारा ठरेल. २०१८ च्या अहवालानुसार देशात फक्त १२,८५२ तर महाराष्ट्रात १,६९० बिबटे आहेत. असे असताना बिबट्यांची नसबंदी करण्याचा विचार हास्यास्पद आहे. त्यामुळे नैसर्गिक जैवविविधता व नैसर्गिक अन्नसाखळी धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिवाय एकूण राज्याच्या वनक्षेत्राचा विचार करता ही संख्या अगदीच किरकोळ आहे.’’
मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर आणि त्यांची संख्या वाढली असून याला आळा घालण्यासाठी नसबंदीचा पर्याय पुढे आला. मात्र, यासाठी केंद्र शासनाची परवानगी आवश्यक असल्याने त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागणार आहेत. वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, ‘‘बिबट्याला पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिंजरा लावण्यात येईल. शहर किंवा गावात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी परवानगी लागते त्याला विलंब होवू नये म्हणून ऑनलाईन परवानगीची व्यवस्था करण्यात येईल. पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असून ते अत्याधुनिक असतील.’’ वन्यजीव संवर्धन करताना वन्यप्राणी आणि मानवी संघर्षाचा प्रश्न हा प्रमुख अडथळा ठरतो. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसान भरपाईची रक्कम तीस दिवसांच्या आत देण्याबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल. बिबट्यांची प्रजननक्षमता कमी करण्यासाठी देशांत प्रयोग झाले असल्यास त्याचा अभ्यास करण्यात येईल. बिबट्यांची नसबंदी कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश यावेळी संबंधितांना मुनगंटीवार यांनी दिले.
जुन्नर वनविभागात सध्या असलेली बिबट्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. प्रामुख्याने मंचर वनविभागात आणि शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. ही संख्या ८०० ते १,२०० इतकी असल्याचा अंदाज आहे. २०१८ मध्ये झालेल्या गणनेत भारतात बिबट्यांची संख्या १२, ८५२ होती. यापैकी ४,४२१ बिबटे मध्य प्रदेशात आढळून आले. बिबट्यांची संख्या कर्नाटकात १,७८३, तर महाराष्ट्रात १,६९० आहे. मध्य भारत आणि पूर्व घाटात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे, जी ८,०७१ इतकी आहे. या क्षेत्रात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.