स्टॅण्ड पडले ओसाड, रिक्षा रस्त्यांवर

मागील काही वर्षांत शहरातील रिक्षांची संख्या झपाट्याने वाढत असताना थांब्यांची संख्या मात्र त्याप्रमाणात वाढलेली नाही. मात्र, अनेक रिक्षाचालक स्टॅण्ड सोडून रस्त्यांवर इतर ठिकाणी थांबत असल्याने अनेक रिक्षा थांबे ओस पडले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 2 Mar 2023
  • 03:30 pm
स्टॅण्ड पडले ओसाड, रिक्षा रस्त्यांवर

स्टॅण्ड पडले ओसाड, रिक्षा रस्त्यांवर

रिक्षाचालक स्टॅण्ड सोडून रस्त्यांवरच थांबत असल्याने वाहतूककोंडीसह प्रवाशांना त्रासरिक्षाचालक स्टॅण्ड सोडून रस्त्यांवरच थांबत असल्याने वाहतूककोंडीसह प्रवाशांना त्रास

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

मागील काही वर्षांत शहरातील रिक्षांची संख्या झपाट्याने वाढत असताना थांब्यांची संख्या मात्र त्याप्रमाणात वाढलेली नाही. मात्र, अनेक रिक्षाचालक स्टॅण्ड सोडून रस्त्यांवर इतर ठिकाणी थांबत असल्याने अनेक रिक्षा थांबे ओस पडले आहेत.

रिक्षाचालकांच्या या मानमानी कारभारामुळे अनेक रिक्षा स्टॅण्ड रिकामे दिसत असतानाच मुख्य रस्त्यांवर वाहतुकीला या रिक्षा अडथळा ठरत आहेत. यामुळे इतर वाहनचालकांची तसेच प्रवाशांचीदेखील अडचण होत आहे. या स्टॅण्डबाबत पुणे महापालिका, वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयही (आरटीओ) उदासीन असल्याची नाराजी रिक्षा संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.

पुणे शहरात सुमारे ८०० ते ९०० रिक्षाथांबे आहे. या स्टॅण्डना २०१० मध्ये परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर मधल्या काळात केवळ शंभरच्या घरात नव्या स्टॅण्डची भर पडली. रिक्षांनी रस्त्यांवर कुठेही न थांबता एका निश्चित ठिकाणी रांगेत उभे राहावे, जेणेकरून प्रवाशांनाही रिक्षा मिळण्यात अडचणी येणार नाही, हा त्यामागचा उद्देश आहे. यासाठी वाहतूक पोलिसांकडून पाहणी करून जागा निश्चित केल्या जातात. 

वाहतुकीला अडथळा होणार नाही आणि प्रवाशांना सोयीचे होईल, अशाच ठिकाणी स्टॅण्ड दिले जातात. या जागा निश्चित झाल्यानंतर आरटीओकडे स्टॅण्डच्या नावासह क्रमांकानुसार नोंद होते. त्याआधी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामध्ये या स्टॅण्डना मान्यता घ्यावी लागते. त्यानंतर प्रत्यक्षात हे स्टॅण्ड अस्तित्वात येतात. आरटीओकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे ९५० रिक्षास्टॅण्डची नोंद आहे. तर वाहतूक पोलिसांकडील पुणे शहरातील स्टॅण्डचा आकडा केवळ साडेचारशे इतकाच आहे. त्यापैकीही अनेक स्टॅण्ड सध्या ओसाड पडल्याचे दिसून येत आहे.

वाहतूक पोलिसांकडून टप्प्याटप्याने रिक्षा स्टॅण्डची पाहणी करून काही स्टॅण्ड अयोग्य असल्याच्या कारणास्तव बंदही केले जातात. पण सध्या अनेक असे स्टॅण्ड आहेत, जिथे एकही रिक्षा उभी नसते. रिक्षा स्टॅण्डच्या फलकालगतच इतर वाहने पार्क केलेली आहेत. काही ठिकाणी पदपथांवर असलेल्या छोट्या व्यावसायिकांचे साहित्य त्या ठिकाणी ठेवलेले असते. स्टॅण्डसमोर रिक्षा उभी करण्यासाठी जागाही नसते. तर काही स्टॅण्डच्या ठिकाणी अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याने रिक्षा तिथे थांबत नसल्याचेही सांगण्यात येते. या रिक्षा लगतच्या रस्त्यांच्या कडेला कुठेही थांबलेल्या दिसतात. त्याचा फटका इतर वाहनांना बसतो. अनेकदा रिक्षांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रिक्षाचालक भाडे नाकारण्याच्या अनेक तक्रारीही येतात.

नियमित रिक्षा स्टॅण्डवर येणारे रिक्षाचालक हे एकमेकांच्या परिचयाचे असल्याने त्याचा फायदा नागरिकांनाही होतो, असे सांगत रिक्षा पंचायतचे सरचिटणीस नितीन पवार म्हणाले, ‘‘सध्या रिक्षा स्टॅण्ड वाढविणे खूप गरजेचे आहे. मागील पाच-सहा वर्षांत रिक्षांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. पण त्याप्रमाणात स्टॅण्ड वाढलेले नाहीत. त्यामुळे रिक्षा उभ्या करण्यासाठी अधिकृत जागा नाही. परिणामी कुठेही रिक्षा उभ्या कराव्या लागतात. काही स्टॅण्डसमोर अतिक्रमण झालेले आहे. याचाही फटका बसतो. स्टॅण्ड असल्यास सर्व रिक्षाचालकासोबतच परिसरातील नागरिकही परिचयाचे होतात. ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्णांसाठी त्यांची खूप मदत होते. त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतात. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसतो. आम्ही यापूर्वी अनेकदा स्टॅण्डबाबत मागणी केली आहे. पण त्याकडे कुठलीच यंत्रणा फारसे गांभीर्याने पाहत नाही.’’

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितले की, ‘‘रिक्षाचालकांनी अधिकृत रिक्षा स्टॅण्डवर थांबणे अपेक्षित आहे. पण त्यांनी कुठे थांबावे, याबाबत आपण त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. पण भाडे नाकारणे किंवा गैरवर्तन आणि इतर तक्रारी असल्यास त्यांच्यावर कारवाई होते. तसेच आमच्या पथकांकडून मार्गावरही त्यांच्यावर कारवाई केली जाते.’’

 रिक्षाचालक स्टॅण्डवर थांबत नसल्याबाबत बोलताना वाहतूक पोलीस विभागाचे निरीक्षक अर्जून बोत्रे म्हणाले, ‘‘रिक्षाचालकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. परिसरातील नागरिक किंवा संघटनांची मागणी आल्यानंतर आम्ही स्टॅण्डबाबत विचार करतो. त्यानंतर संबंधित जागेची पाहणी करून स्टॅण्डला जागा देण्याबाबत पालिकेला विनंती करतो. नंतरच स्टॅण्ड अधिकृतपणे दिला जातो.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story