पैसे परत मागितले म्हणून भोसकले
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
हातउसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला म्हणून ७० वर्षीय निवृत्त बँक व्यवस्थापकाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथे घडली आहे. खून करून आरोपींनी मृतदेह ताम्हिणी घाटातील धबधब्यात फेकून दिल्याने स्थानिक ट्रेकरच्या मदतीने चिंचवड पोलिसांनी हा मृतदेह दोनशे फूट खोल दरीतून बाहेर काढला. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट- २ व चिंचवड पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
रणजित मेला सिंग (वय ७०, रा. वाघोली, पुणे) असे अपहरण आणि खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सिंग हे पंजाब सिंध बँकेत व्यवस्थापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी नारायण बाबुराव इंगळे (वय ४६, रा. चिंचवडगाव) याला पोलिसांनी आधीच अटक केली होती, तर सुपारी घेऊन खून करणारे आरोपी राजेश नारायण पवार, समाधान ज्ञानोबा म्हस्के (दोघे रा. चिखली) या दोघांना सापळा रचून चिखली घरकुल परिसरातून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात सिंग यांचे जावई आदित्य पाकलपाटी (वय ३९, रा. हैदराबाद) यांनी फिर्याद दिली आहे, तर त्यापूर्वी सिंग हे इंगळे याला दिलेले उसने पैसे आणण्यासाठी चिंचवडला गेले आणि परत आलेच नाही, अशी त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार त्यांच्या पत्नीने तीन दिवसांपूर्वी चिंचवड पोलिसांकडे दिली होती.
नारायण इंगळेने रणजीत सिंग यांच्याकडून ३० लाख रुपये उसने घेतले होते. ते पैसे परत दे म्हणून सिंग यांनी नारायण इंगळे याच्याकडे सतत तगादा लावला होता. नारायण इंगळे याला ते पैसे परत द्यायचे नव्हते. यासाठी त्याने सिंग यांना संपवण्याचाच कट आखला. यासाठी त्याने त्याचे मित्र राजेश व समाधान यांना हाताशी घेतले व त्यांना सिंग यांच्या खुनासाठी ४ लाख रुपयांची सुपारी दिली.
या कटानुसार सिंग यांना १९ जुलै रोजी इंगळेने चिंचवड येथील त्याच्या राहत्या घरी पैसे देतो म्हणून बोलावून घेतले. ते घरी आल्यानंतर त्यांच्यासोबत बोलत असताना इंगळे व राजेश यांनी मागून येऊन सिंग यांचा दोरीने गळा आवळून व समाधान म्हस्केने चाकूने चार ते पाच वेळा भोसकून ठार मारले. सुरुवातीला आरोपींनी एकमेकांना ओळखत नसल्याचा बहाणा केला. मात्र, पोलीस खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले.
सिंग यांच्याच गाडीचा वापर करत लावली मृतदेहाची विल्हेवाट
खून केल्यानंतर सिंग यांचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून बेडशीटमध्ये बांधून त्यांच्याच ब्रेझा गाडीत टाकला. पुढे राजेश पवार व समाधान म्हस्के यांनी त्यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात धबधब्यात टाकून दिला, तर गाडी माणगाव एम.आय.डी.सी. परिसरात सोडली असल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावलेले ठिकाण आणि गाडी सोडल्याचे ठिकाण दाखवले. त्यानंतर चिंचवड पोलिसांनी आणि गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक ट्रेकरच्या मदतीने २०० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला.
चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णदेव खराडे, निरीक्षक प्रकाश जाधव, गुन्हे शाखा युनिट २ चे निरीक्षक जितेंद्र कदम, फौजदार गणेश माने, शंभू रणवरे, कर्मचारी जयवंत राऊत, प्रमोद वेताळ, देवा राऊत, जमिर तांबोळी, पांडुरंग जगताप, धर्मनाथ तोडकर, पंकज बदाणे, उमेश वानखेडे आदींच्या पथकाने गेल्या तीन दिवसांच्या प्रयत्नांनंतर सिंग यांचा मृतदेह शोधून काढला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.