आवारे खून तपासासाठी ‘पथक पे पथक’
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येला एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. हत्या करणारे आरोपी आणि हत्येच्या कटातील सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा, यासाठी आता या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीला आणखी एका पथकाची जोड देण्यात आली आहे.
किशोर आवारे यांच्या आई, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी मुलाच्या खुनाचा तपास वेगाने करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. १३) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. तसेच त्यांनी पोलीस आयुक्तांची भेटदेखील घेतली. त्यानंतर एसआयटीला अन्य एका पथकाची जोड देण्यात आली. किशोर आवारे यांच्या खून प्रकरणामुळे मावळ परिसरामध्ये राजकीय वाद विकोपाला गेला आहे. एक गट खुनाच्या घटनेमध्ये राजकीय वादातून काही लोकांची नावे गोवण्याचा आरोप करत आहे, तर दुसरा गट वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा खून घडून आणल्याचा दावा करत आहे.
किशोर आवारे हत्या प्रकरणात गौरव भानू खळदे (रा. तळेगाव), शाम अरुण निगडकर (वय ४६, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण संभाजी धोत्रे (वय ३२), आदेश विठ्ठल धोत्रे (वय २८, रा. नाणे, ता. मावळ), संदीप ऊर्फ नन्या विठ्ठल मोरे (वय ३२, रा. आकुर्डी), श्रीनिवास ऊर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगळ (रा. देहूरोड) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. माजी नगरसेवक भानू खळदे अद्याप फरार आहे. त्याच्या मागावर पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत. तसेच वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्यासह अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
बांधकाम साईटसमोरील झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याच्या संशयावरून किशोर आवारे आणि भानू खळदे यांचा मागील वर्षी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयात वाद झाला. यामध्ये आवारे यांनी खळदे याच्या कानशिलात लगावली होती. त्या रागातून खळदेचा मुलगा गौरवने आवारे यांची हत्या घडवून आणण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने आरोपींना सुपारी दिली. त्यातून १२ मे रोजी दुपारी चार जणांनी नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आवारे यांची हत्या केली.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये हत्या करणारे चार जण, त्यांना मदत करणारा एक आणि आरोपींना सुपारी देणाऱ्या एकाचा समावेश आहे. घटना घडल्यानंतर भानू खळदे पळून गेला. या हत्या प्रकरणाला एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मुख्य आरोपीच्या अटकेसाठी किशोर आवारे यांच्या आई माझी नगराध्यक्ष सुलोचना आवारे यांनी मंगळवारी, (दिनांक १३) एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्यांनी मंगळवारी दुपारी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची भेट घेतली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.