'स्पेशल १०८' रोखणार सायबर गुन्हे
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
विज्ञान शाखेची पदवी असणारे आणि सायबर विभागात यापूर्वी काम केलेल्या १०८ पोलिसांची निवड करून त्यांना 'सायबर एक्सपर्ट' बनवण्याचे काम आता आयुक्तालय स्तरावर सुरू झाले आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या गुन्ह्यांना अटकाव घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी हा निर्णय घेतला आहे. 'स्पेशल १०८' हे विशेष पथक सायबर गुन्ह्यांना आळा घालणार आहे.
पोलीस ठाणे स्तरावर वर्षाकाठी विविध स्वरूपाचे जेवढे गुन्हे दाखल होतात त्यातील बरेचसे गुन्हे हे सायबर कायद्यान्वये दाखल होत असून, नागरिकांचे कोट्यवधी रुपये ऑनलाईन माध्यमातून सायबर चोरट्यांकडून लंपास केले जात आहेत. त्यामुळे बँक खात्यातून पैसे गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात येताच तत्काळ संबंधित बँकांशी संपर्क करून, पुढील कार्यवाही त्वरित करण्यासाठी या विशेष पथकाचा उपयोग होणार आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्सचा (एआय) वापर विविध कारणांसाठी जगभरात होत असतानाच आता सायबर चोरट्यांकडून देखील एआयचा वापर होऊ लागला आहे. वैयक्तिक पातळीवर काही हजारांपासून ते ८८ लाखांची फसवणूक ऑनलाईन टास्कच्या माध्यमातून झाल्याचे गुन्हे गेल्या काही दिवासंमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत.
गेल्या पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पोलीस आयुक्तालयात सध्या सायबर क्राईम विभाग कार्यरत आहे. महाराष्ट्रातील सायबर एक्सपर्टपैकी एक म्हणून गणले जाणारे पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार हे या विभागाचे प्रमुख आहेत, तर फौजदार/सहायक निरीक्षक दर्जाचे चार अधिकारी आणि १७ कर्मचाऱ्यांची टीम पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या १८ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा मागोवा घेत स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना पकडण्याचे काम करीत आहेत.
मात्र, दररोज दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या आणि सायबर क्राईम विभागात कार्यरत असणाऱ्या पोलिसांची संख्या यात मोठी तफावत आहे. पोलीस आयुक्त चौबे हे 'आयआयटी' कानपूरमधून शिक्षण घेतलेले आयपीएस अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी 'आयटी-बीटी' पार्क आणि उच्चशिक्षितांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
पोलीस दलात उच्च शिक्षित कर्मचारी-अधिकाऱ्यांची नियुक्ती गेल्या काही वर्षात झाली आहे. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस कर्मचारी भरती प्रक्रियेत काही पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता. त्यामुळे अशा नव्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार आणि कौशल्यानुसार नियुक्ती दिली जात आहे. शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर तोडगा काढण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर सायबर पथक तयार करण्याचा निर्णय आयुक्त चौबे यांनी घेतला. त्यानंतर यासाठी विज्ञान शाखेची पदवी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना हेरून त्यांचा समावेश या पथकात करण्यात आला आहे. तसेच ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना यापूर्वीचा सायबर क्राईम विभागाचा अनुभव आहे आणि ज्यांनी या विभागात काम केले आहे अशांचाही समावेश या पथकात करण्यात आला आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्यात एक फौजदार/सहायक निरीक्षक आणि किमान २ कर्मचाऱ्यांची या स्कॉडसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. काही पोलीस ठाण्यांमध्ये २ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश या स्कॉडमध्ये करण्यात आला आहे. यापूर्वी सर्व पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांना सायबर क्राईमचे विशेष ट्रेनिंग देण्यात आले होते. त्यानंतर आता या १०८ पोलिसांसाठी विशेष प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. लाईक, शेअर, कमेंट, रिव्ह्यू, ऑनलाईन मार्केटिंग अशा स्वरूपाचे काम घरबसल्या देतो असे सांगत अनेकांना आतापर्यंत गंडा घालण्यात आला आहे. टेलिग्राम या ॲप्लिकेशमध्ये ग्रुप तयार करून त्याव्दारे लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. फसणाऱ्यांमध्ये सर्वच वयोगटातील नागरिकांचा समावेश असून, उच्च शिक्षितांची संख्या यामध्ये लक्षणीय आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.