मंचरजवळ शर्यतीच्या घाटातून सोन्या नावाचा बैल पळून गेल्यावर बैलमालक आणि पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली
सीविक मिरर ब्यूरो
घरातून मुले पळाली, प्रेमीयुगुल पळाले अशासारख्या घटना आपण ऐकलेल्या आहेत. मात्र, बैलगाडा शर्यतीच्या घाटातून धावणारा बैल पळून गेल्याचे आपण कधी ऐकलेले नसेल. मात्र, शर्यतीच्या घाटातून चक्क सोन्या नावाचा बैल पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. बैल मालकाने त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, सोन्या बैलाचा कोठेही शोध लागला नाही. घाटातून सोन्या पळाला, पळतच राहिला... अशी स्थिती झालेली आहे. यामुळे बैलाच्या मालकाने थेट सोन्याचा शोध घेण्यासाठी मंचर पोलिसात बैल हरवल्याची फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनंता तुकाराम पोखरकर यांनी आपला 'सोन्या' नावाचा बैल आणखी तीन बैलांसोबत गाडा पळविण्यासाठी घाटात वाजत गाजत आणला होता. सोन्या हा शर्यतीच्या घाटात पळण्यात मोठा तरबेज होता. आसपासच्या परिसरात देखील त्याच्या नावाची चांगलीच चर्चा असायची. तो बैलगाडा घाटात आल्यावर प्रेक्षकही त्याच्या कौशल्याला प्रतिसाद द्यायचे. सोमवारी दुपारी शर्यतीच्या घाटात सोन्या दाखल झाल्यावर त्याला नेहमीसारखा प्रतिसाद मिळाला. सोन्याला शर्यतीसाठी गाड्याला जोडत असताना त्याने हिसका मारला आणि घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर त्याचा पत्ता लागलेला नाही. गेले दोन दिवस मालक त्याचा शोध घेत होते. मात्र तो कुठेही सापडला नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.