Milk and Medicine! : कधी दूध, तर कधी औषध!

तस्करीत एक युक्ती फसल्यानंतर अनोख्या पद्धतीने दारू तस्कर आपले डोकं लढवत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईवरून समोर आले आहे. कधी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या तर कधी दुधाच्या वाहनांतून दारू आणण्याचा प्रयत्न उघड झाल्यानंतर दारू तस्करांनी आता औषध वाहतुकीच्या नावाखाली तस्करी करण्याची आयडिया काढली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 26 Apr 2023
  • 05:39 am
कधी दूध, तर कधी औषध!

कधी दूध, तर कधी औषध!

दारू गोव्यातून राज्यात आणण्यासाठी तस्कर शोधताहेत ‘एक से बढकर एक’ मार्ग

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

तस्करीत एक युक्ती फसल्यानंतर अनोख्या पद्धतीने दारू तस्कर आपले डोकं लढवत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईवरून समोर आले आहे. कधी इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या तर कधी दुधाच्या वाहनांतून दारू आणण्याचा प्रयत्न उघड झाल्यानंतर दारू तस्करांनी आता औषध वाहतुकीच्या नावाखाली तस्करी करण्याची आयडिया काढली आहे.

अर्थात गोपनीय माहितीमुळे तस्करांचा हा डावही उधळला गेला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुळशी तालुक्यातील माले गावाजवळ केलेल्या कारवाईत गोव्यावरून आलेल्या मद्याचे सहाशेहून अधिक बॉक्स जप्त करण्यात आले. गेल्या वर्षभरात तब्बल २१ वेळा गोव्याहून महाराष्ट्रात तस्करी केलेल्या मद्याचा ९ कोटी रुपयांहून अधिक साठा जप्त करण्यात आला आहे.

गोव्यात मद्यावर उत्पादन शुल्क आकारले जात नाही. महाराष्ट्रात मद्यावर प्रचंड प्रमाणात उत्पादन शुल्क आकारले जाते. त्यामुळे गोव्यातील स्वस्त मद्याची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. मद्याची तस्करी करण्यासाठी तस्कर विविध युक्त्या अवलंबितात. इलेक्ट्रॉनिक साहित्याची वाहतूक करीत असल्याचे भासवण्यासाठी तशी बोगस कागदपत्रे तयार करतात. कधी ट्रकमध्ये विशिष्ट प्रकारचे कंपार्टमेंट केले जाते. त्याचे दार ट्रकच्या बाजूने उघडते. म्हणजे मागील बाजूने कितीही तपासणी केली तरी आतील गुप्त कंपार्टमेंटचा माग काढणे अवघड जाते, तर कधी चक्क दुधाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचाही वापर केला जात आहे. उत्पादन शुल्क विभागाने एखादी आयडिया उघडकीस आणल्यास तस्कर नवीन आयडिया काढत आहेत. उत्पादन शुल्क विभागाने खबऱ्यांचे जाळे पक्के केल्याने गेल्या वर्षभरात तब्बल २१ मोठ्या कारवाया यशस्वी झाल्या. त्यात ८.६४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या कारवाईची रक्कम गृहित धरल्यास हा आकडा नऊ कोटी रुपयांवर जातो.

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग बी. राजपूत सीविक मिररशी बोलताना म्हणाले, मद्याची तस्करी करण्यासाठी दारू तस्करांनी औषधांचा आधार घेतला होता. तपासणी झाल्यास संशय येऊ नये म्हणून औषधांची बोगस कागदपत्रे तयार केली होती. त्याचबरोबर ट्रक ताडपत्रीने पक्का बांधला होता. संशय येऊ नये याची त्यांनी पुरेपूर दक्षता घेतली होती. तरीही उत्पादन शुल्क विभागाला गोव्याहून तस्करी केला जाणारा मद्याचा साठा जप्त करण्यात मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. दोन वर्षांपूर्वी केवळ चार वेळा गोव्यातील मद्यसाठा जप्त करण्यात आला. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात तब्बल २१ वेळा मोठ्या कारवाया झाल्या. तस्कर कधी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची वाहतूक करण्याच्या बहाण्याने मद्याची वाहतूक करतात, तर कधी दुधाच्या वाहनाचाही आधार घेताना दिसत आहे. तर, कधी लाकडाच्या भुस्स्यातून मद्यसाठा करून नेत असल्याचे समोर आले आहे.

पुणे-माणगाव महामार्गावर सोमवारी रात्री तपासणी सुरू होती. त्यावेळी मौजे माले गावाजवळील हॉटेल लाल मिर्चजवळ एका ट्रकला संशयावरून थांबवण्यात आले. सहा चाकी असलेला हा ट्रक ताडपत्रीने पूर्ण झाकलेला होता. चालकाकडे कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यात औषधे असल्याचे त्याने सांगितले. तसेच, विविध प्रकारची इंजेक्शन्स आणि औषधे असल्याची कागदपत्रेही त्याने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सादर केली. मात्र, उलट तपासणीत औषधे कोठून आणली आणि कोठे पुरवठा केला जाणार, याबाबत चालकाला ठोस उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे ट्रक बाजूला घेऊन तपासणी केली गेली. त्यात विविध कंपनीच्या व्हिस्कीचे तब्बल ६६३ बॉक्स आढळले.

 या प्रकरणी दानाराम चुनाराम नेहरा, रुखमनाराम खेताराम गोदरा यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून दारूसह एक सहा चाकी ट्रक, मोबाइल असा ५७ लाख २५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड विभागाने कारवाई करीत 

गोव्यातून तस्करी करण्यात आलेला मद्याचा साठा जप्त केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story