काही नेते अजूनही इधर चला, मैं उधर चला...
विजय चव्हाण
अजित पवारांना राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांपैकी ४० आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर नऊ आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले. काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला, तर काहींनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीरपणे सांगितले. काहींनी तर मुंबईत शपथविधीला हजेरी लावून पुन्हा शरद पवारांच्या गोटात सामील झाल्याचे चित्र सोमवारी (दि. ३) पाहायला मिळाले. मंगळवारी (दि. ४) मात्र ‘पवारवासी’ झालेल्या काहींनी पुन्हा कोलांटउडी घेतल्याचे चित्र होते.
आपण शरद पवार यांच्या गटात आहोत की अजित पवार यांच्या गटात, यावरून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे गोंधळात असल्याचे समोर आले आहे.
‘‘मुंबईत बैठक झाली त्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. नंतर जी काही नाट्यमय घटना घडली, त्यानंतर मी पवार साहेबांसोबत आहे,’’ असे सोमवारी प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले होते. मात्र मंगळवारी त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्यामुळे तनपुरे नेमके कोणाला पाठिंबा देत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
हडपसरचे आमदार चेतन तुपे पवारांसोबत राहतील, असा अंदाज पहिल्या दिवशी होता. ते मुंबईतही नव्हते; मात्र सोमवारी तुपे ‘नाॅट रिचेबल’ झाले. मंगळवारच्या पुण्यातील बैठकीलाही ते हजर नव्हते.
दरम्यान, अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्यानंतर २४ तासांतच नैतिकतेची जाणीव झाल्यानंतर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले. मंगळवारी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘पदाचा मोह न बाळगता लोकशाही मूल्ये टिकवण्याच्या आपल्या संघर्षात एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चित सहभागी असेन, असे सांगतानाच लोकशाहीप्रणाली विषयी अनास्था निर्माण करण्याचे पाप या महाराष्ट्रात केवळ सत्तेसाठी घडविण्यात येत आहे, अशा भावना निर्माण झाल्याने राजीनामा देण्याचा विचार अमोल कोल्हे यांनी बोलून दाखवला. तसेच शरद पवार यांनी याबाबत मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
शपथविधीचे साक्षीदार आमदार दिलीप मोहिते बुधवारी (दि. ५) शरद पवारांच्या की अजित पवारांच्या बैठकीला हजर राहणार, हे अद्याप ठरलेलं नाही. मात्र त्यांना शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटातून फोन येत आहेत. आपण कोणासोबत जाणार, हे जनतेशी संवाद साधूनच ठरवणार, असं दिलीप मोहिते पाटलांनी सांगितलं आहे. आपण कोणाच्या दबावाला बळी पडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.