सोसायटयांच्या समस्या तातडीने सोडवू
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
हाउसिंग सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आतापर्यंत अनेक प्रश्न आमच्या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून मार्गी लागले असून, येत्या काळात सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार आहे. आचारसंहिता असल्याने जास्त घोषणा आताच करणार नाही, पण यापुढे तुम्हाला समस्या भेडसावणार नाहीत अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाकड, पिंपळे सौदागर, रहाटणी, रावेत येथील सोसायटी पदाधिकाऱ्यांना दिली.
परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये फडणवीस यांनी सोसायट्यांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे, आमदार श्रीकांत भारतीय, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रचारप्रमुख शंकर जगताप, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, वाकडमधील भाजपचे सर्व स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच वाकडमधील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, प्रतिनिधी तसेच नागरिक उपस्थित होते.
वाकड परिसरातील अतिक्रमण, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी तसेच अन्य अनेक मूलभूत प्रश्नांसाठी करावा लागणारा आमचा संघर्ष संपवा, अशी मागणी यावेळी उपस्थितांनी फडणवीस यांच्याकडे केली. पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे प्रवक्ते अरुण देशमुख यांनी, ‘आम्हाला डिम्ड कन्व्हेयन्सची सक्ती नको,’ अशी मागणी केली. तसेच सोसायटीच्या उत्पन्नावर लावला गेलेला इन्कम टॅक्सचा प्रश्न केंद्राशी संवाद साधून सोडवावा. मोफा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, हे मुद्दे उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. सचिन लोंढे यांनी पाणी प्रश्नामुळे आम्ही पूर्वी फेडरेशनच्या माध्यमातून एकत्र आल्याचे सांगितले. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक लावण्याची मागणी त्यांनी केली.
संजीवन सांगळे यांनी ‘भामा आसखेडचे पाणी लवकर मिळावे. त्याच्या राजकीय उद्घाटन कार्यक्रमासाठी वेळ घालवू नये,’ अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी ‘‘कचरा व्यवस्थापन प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा. एकाने पाणी बिल नाही भरले तर सरसकट पाणी कापणे हा कारभार आमच्या पातळीवर आम्ही बंद केला. बिल्डर फ्लॅट घेताना त्यांना स्वर्ग दाखवतो, पण नंतर परिस्थिती वेगळी असते. प्लॅन बदलला जातो. त्यामुळे लोकांना त्रास होतो आणि ते आमच्याकडे येतात त्यामुळे यासाठी ठोस निर्णय घेण्यात येणार आहे,’’ असे यावेळी सांगितले.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना सांगितले, ‘‘सोसायटी फेडरेशनसाठी मी स्वतंत्र वेळ देणार आहे. निवडणूक झाली की सविस्तर बैठक घेणार आहे. आचारसंहिता असल्याने मर्यादित बोलावे लागते. लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या जोडीने शहरातील अनेक प्रश्नांसाठी मोठे काम केले आहे.’’
‘‘रस्ते, वाहतूक, पाणी, कचरा या सर्व समस्या सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. शहरातील जनतेने पहिल्यांदाच भाजपच्या हातात महापालिकेची सत्ता दिल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत विकासाला प्रचंड गती देण्यात आली आहे. काही प्रश्न सुटलेले नसतील तर तेसुद्धा सोडवण्याची धमक फक्त भाजपमध्येच आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे आम्ही दुर्लक्ष करणार नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शासन आणि महापालिकेकडे सतत पाठपुरावा केला होता. अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. काही राहिलेले प्रश्नही सोडवू,’’ असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. तसेच पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी गृहनिर्माण सोसायट्यांतील नागरिकांना केले.
सोसायटीला इन्कम टॅक्स लागू होत असल्याने याबाबत केंद्रीय अर्थमंत्री यांना विनंती करणार आहे, असे सांगत फडणवीस म्हणाले, ‘‘शहर अधिक चांगल्या प्रतीचे राहण्यायोग्य कसे करता येईल, यासाठी आम्हाला मतरूपी आशीर्वाद द्या; मोदींनी दिलेला अजेंडा चिंचवडमध्ये राबवू .’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.