वापरले सहप्रवाशांचे सहा फोन; कळवला स्वतःचाच रेल्वे 'रुट'
विजय चव्हाण
एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकावर येऊन वनाधिकारीपदी निवड झालेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली असून राहुल हंडोरेच्या अटकेनंतर तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. तपासात हंडोरेने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीचा खून केल्यानंतर पोलिसांना आपला ठावठिकाणा समजू नये म्हणून केलेले प्रयत्न समोर आले आहेत.
आपला मोबाईल बंद करून पोलिसांना चकवा देता येईल अशा समजातून हंडोरेने सांगली ते हावडा आणि हावडा ते मुंबई प्रवासादरम्यान आपला फोन गहाळ झाल्याची बतावणी केली. इतर लोकांना विनंती करत त्यांच्या मोबाईलचा वापर करून घरच्यांशी संपर्क साधला. तब्बल सहा वेळा असा वेगवेगळ्या नातेवाईकांशी संपर्क केल्यानंतर आधीच 'अलर्ट' असलेल्या पोलिसांनी त्याचा 'रुट' शोधून काढला आणि योग्य वेळ येताच पुणे ग्रामीण पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. हंडोरे अशाप्रकारे स्वत:च्याच जाळ्यात अडकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल हंडोरेने केवळ पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्याने पोलिसांची दिशाभूल व्हावी म्हणून विविध प्रकारे प्रयत्न केले. १८ जूनला दर्शनाचा मृतदेह आढळल्यानंतर राहुल हंडोरेने पुणे सोडले आणि रेल्वेने प्रवास करण्यास सुरुवात केली. तो आधी सांगलीला गेला. तेथून तो गोव्याला गेला. आरोपी राहुल गोव्यातच थांबला नाही, तर पुढे चंदीगढ आणि तेथून पश्चिम बंगालमधील हावडा येथे गेला. वरवर पाहता आरोपी राहुलचा हा प्रवास मोघम वाटत असला, तरी तो तसा नव्हता. त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रयत्न केले. तो हावडावरून मुंबईला आला. या संपूर्ण रेल्वे प्रवासात त्याचा मोबाईल बंद होता.
"आरोपी राहुल हंडोरेने या काळात इतरांकडून फोन घेऊन आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना पाच-सहा वेळा कॉल केले. तो प्रवासात स्थानिक लोकांकडे मदतीची विनंती करत कुटुंबाला कॉल करण्यासाठी फोन करायचा. पोलिसांना त्याच्या कुटुंबाकडून या नंबरवरची माहिती मिळाल्यानंतर या नंबरवर पुन्हा कॉल करण्यात आले. त्यानंतर या प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करणाऱ्या आणि कुटुंबाला कॉल करण्यासाठी फोन मागणाऱ्या राहुल हंडोरेची माहिती दिली," अशी माहिती एका तपास अधिकाऱ्याने ‘सीविक मिरर’ला दिली.
"हंडोरेने पोलिसांना माग लागू नये म्हणून प्रवासात लोकांकडे अन्न मागून खाल्ले. एखाद्या हॉटेलात सीसीटीव्हीच्या कक्षेत येऊ नये, याची त्याने काळजी घेतली. पोलिसांनी त्याच्या शेवटच्या कॉलच्या आधारे तो कुठे आहे हे शोधून तपास पथके पाठवली असती, तरी ते प्रयत्न अपयशी ठरतील असा त्याने प्रयत्न केला. इतरांच्या फोनवरून कॉल करून लगेच ठिकाण बदलायचा. या दरम्यान तो येण्याचा रेल्वे मार्ग पोलिसांच्या लक्षात आला, मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर तो येणार असल्याची माहिती समजल्यानंतर त्याला अटक करण्यात आम्हाला यश आले. तो अंधेरीहून पुण्याला येणार होता, जेणेकरून पोलीस त्याला पुणे सोडून देशभर शोधत बसतील असा त्याचा कयास होता," अशी माहितीही या अधिका-याने दिली.
तक्रारीनुसार, आरोपी हंडोरे दर्शनासोबतच एमपीएससीची तयारी करत होता. तो गेल्या काही वर्षांपासून अर्ध वेळ नोकरी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. त्याने वेगवेगळ्या परीक्षाही दिल्या आहेत. सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये काम करत होता आणि एका रूममध्ये राहात होता. दोघांची ओळख लहानपणापासून होती. दर्शनाने लग्न करण्यास नकार दिल्याने चिडून त्याने कट रचून तिची आधी कटरचा वापर करून आणि नंतर दगडाने हत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.