शहरात दिवसात विविध ठिकाणी सहा घरफोड्या
#पुणे
शहरातील घरफोडीचे सत्र कायम असून बंद असणारे घर, सदनिका यांच्यावर विशेष लक्ष ठेवून तेथे चोरी करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुरुवारी दिवसभरात शहरात विविध ठिकाणी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एका दिवशी सलग सहा ठिकाणी चोरी झाली.
यातील पहिल्या घटनेत नऱ्हे परिसरातील बंद घराचा कोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. १० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ४१ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी कविता कुलदीप ताकवले (वय ४१, नऱ्हे, धायरी रस्ता) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ही घटना २२ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान घडली.
दुसऱ्या घटनेत वडगाव बु. येथील एका बंद घराचा कोयंडा तोडून घरातील बेडरूमच्या कपाटातील ७० हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. या प्रकरणी माणिक नारायण भोकरे (वय ७०, रा. वडगाव बु.) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १ ते २ ऑगस्ट दरम्यान घडली.
तिसऱ्या घटनेत बिबवेवाडी येथील एक कुटुंब देवदर्शनासाठी गावी गेले असतांना चोरट्याने घराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील ४ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ३० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी माधुरी प्रकाश ओसवाल (वय ४३, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ५ च्या दरम्यान घडली.
चौथ्या घटनेत मार्केट यार्ड परिसरातील एका घराचा कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि १३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी विनायक संजय चव्हाण (वय ३०, रा. बिबवेवाडी कोंढवा रोड) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २ ऑगस्ट रोजी घडली.
पाचव्या घटनेत लोणीकंद परिसरातील एकाच सोसायटीतील २ बंद घरांचे कोयंडे तोडून चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्या, चांदीचे दागिने असा ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी देविदास शामराव काळे (वय ४२, रा. उरळी देवाची) यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १ ते २ ऑगस्ट दरम्यान घडली. नाना पेठेतील बंद दुकानाच्या शटरचे लॉक तोडून चोरट्याने ४ लाख १० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
feedback@civicmirror.in