सिंहगड किल्ल्याजवळ मधमाशांचा हल्ला
पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या पश्चिमेस असलेल्या भवानी माता मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात एकाच कुटुंबातील १० जण जखमी झाले आहेत. यातील सर्व पर्यटकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव मावळ येथील काही पर्यटक सिंहगड किल्ल्याजवळील सांबरेवाडी परिसरातील भवानी माता मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी मधमाशांनी अचानक हल्ला केला. या मधमाशांचा हल्ला इतका तीव्र होता की, चावा घेतल्यानंतर पर्यटक जागीच चक्कर येऊन पडले.
याबाबत माहिती मिळताच कुटुंबातील इतर सदस्यांनी जखमींना शोधून काढले. त्यानंतर सिंहगड रोडवरील श्रेयस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या १० जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.