सिंहगडाने अनुभवले शिवराज्याभिषेकाचे सुवर्णक्षण
विजय चव्हाण
हर हर महादेव... जय भवानी, जय शिवराय... छत्रपती संभाजी महाराज की जयचा अखंड जयघोष... शंख, हलगी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर... भंडारा आणि फुलांची उधळण... भगवे झेंडे घेऊन सिंहगडावर शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जमलेल्या शिवभक्तांचा जनसागर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी... अशा चैतन्यमय वातावरणात सिंहगडावर शिवराज्याभिषेकाचा सुवर्णक्षण साजरा झाला. इतिहासात घडलेला हा सुवर्णक्षण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी शेकडो शिवभक्तांनी गडावर मोठ्या संख्येने हजेरी लावली.
श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी छत्रपती राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकापासून आयोजित दुचाकी रॅलीने झाला. यावेळी इतिहास चिकित्सा, दुर्ग चिकित्सा, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे , ऐतिहासिक ग्रंथ परिचय, शिवकालीन शस्त्रकला आदी बाबींचा समावेश असणारी, शिवशक ही स्मरणिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशित झाली.
कार्यक्रमाला सरनोबत सरसेनापती येसाजी कंक यांचे थेट वंशज आकाश कंक, अनमोल कंक, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन ही बाब लक्षात घेऊन रॅली दरम्यान बीज गोळ्यांचे रोपण करण्यात आले.
श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण म्हणाले की, भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. ज्येष्ठ शु. त्रयोदशी नृपशालिवाहन शके १५९६ या दिवशी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. त्या प्रसंगाचे मूक साक्षीदार म्हणजे स्वराज्यातील गड किल्ले होय. त्यामुळे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन प्रत्येक गड किल्ल्यावर झाले पाहिजे. सोहळ्याकरिता पाहणी करत असताना छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाची पडझड झालेली दिसली. त्यामुळे त्या स्थळाची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्यात यावी, तसेच किल्ले सिंहगड येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचे पूर्णाकृती पुतळे बसवले जावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.