‘जरा देख के चलो’ साठी शिव ठाकरे झाला रस्त्याचा राजा
गौरव कदम
शिव ठाकरे हा मूळचा अमरावतीकर असला तरी पुण्यावरील त्याच्या प्रेमाबाबत कोणी शंका घेऊ शकणार नाही. पुणे शहर राहण्यासाठी अधिक चांगले बनावे यासाठी, जेवढी जमेल तेवढी मदत करण्यासाठी तो नेहमी तयार असतो. ‘बिग बॉस मराठी’ चा विजेता शिव ठाकरे याने रविवारी आपल्या भरगच्च कामातून वेळ काढला आणि कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोडवरील एबीसी फार्म येथे वाहतूक पोलिसांसमवेत काही वेळ वाहतुकीचे नियंत्रण केले.
बिग बॉस मराठी गाजवलेल्या शिव ठाकरेच्या मतानुसार वाहतूक पोलीस खऱ्या अर्थाने हिरो असून ते कोणत्याही आभाराच्या अपेक्षेशिवाय आपले कर्तव्य पार पाडत असतात. यामुळेच वाहतूक पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी ‘सीविक मिरर’ आणि ‘ पुणे टाइम्स मिरर ’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘जरा देख के चलो’ या उपक्रमात शिव ठाकरे सहभागी झाला. नॉर्थ मेन रोडवरील एबीसी फार्म येथे बऱ्याच वेळा सिग्नल काम करत नाहीत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांच्या त्रासात भर पडते.
शिव ठाकरेच्या समवेत डी. वाय. पाटील पिंपरीचे विद्यार्थी आदित्य कुचनूर, श्रीकांत तांबेकर, नुपूर म्हात्रे, रुपश काळे, पल्लवी पाटील, रितेश कोल्हे, प्रेम डिंबळे, रचित जैन, प्रेरणा राहणे, देवयानी पाटील, देवश्री भोंडे, जनक पाटील, यश डेरे, आयुश ढोकाते, प्रसाद सूर्यवंशी, तेजस, प्रणाली मोदी, वीरेंद्र कराडे, महेश कोठावडे, नभा मुळे, ऋषभ जाधव, आर्या हिरवे आणि कुणाल कंक यांनी वाहतूक नियंत्रणास हातभार लावला. युवा शक्ती येथे जोशात कार्यरत होती.
‘जरा देख के चलो’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याबद्दल ‘सीविक मिरर’ आणि ‘ पुणे टाइम्स मिरर ’ चे अभिनंदन करून शिव ठाकरे आपल्या अनुभवाबद्दल म्हणाला की, अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी युवक मोठ्या उत्साहाने पुढे येत असल्याचे चित्र आशादायक आहे. नि:स्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे मी मनापासून आभार मानतो. काही काळ स्वयंसेवक म्हणून मदत करताना त्यांच्यासमवेत काम करणे ही माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याबरोबर वाहतूक पोलिसांचाही आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.