किरीट सोमय्या यांच्या समाधानासाठी शिवसैनिकांना अटक केले
गेल्या वर्षी ५ फेब्रुवारी २०२२ रोजी भाजप नेते किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत आले होते. यावेळी तेथे गदारोळ झालेला पाहायला मिळाला. मात्र १४ महिन्यानंतर आता सत्ता पालट झाल्यावर हे प्रकरण पुन्हा एकदा उखडून काढले जात आहे, यानंतर आमचा एकही पदाधिकारी आत गेला तर किरीट सोमय्या यांची सुट्टी नाही, असा इशारा ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या झालेल्या मारहाण प्रकरणी ४ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावर बोलताना मोरे म्हणाले की, “पुणे महापालिकेत किरीट सोमय्या आले, तेव्हा आम्ही महापालिकेतील भ्रष्टाचार दाखवण्यासाठी त्यांना पत्र देण्यासाठी गेलो होतो. मात्र त्यावेळी आमचे निवेदन न स्वीकारता ते तसेच पुढे गेले होते. मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे होती, तेव्हा त्यांचा पाय घसरला आणि ते पडले. त्यानंतर शहराध्यक्षांसह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही जामीनावर बाहेर निघालो.”
“मात्र पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांचा बालहट्ट पुरवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या चार जणांना अटक करण्यात आली आहे. यापुढे शिवसेनेचा एकही कार्यकर्ता अशा प्रकारे उचलला तर आम्ही किरीट सोमय्या यांची पळता भुई थोडी करू, आम्ही आंदोलन करू, किरीट सोमय्या जर पुण्यात आले तर त्यांची आता सुट्टी नाही” असा इशारा देखील यावेळी संजय मोरे यांनी दिला.