बाप-लेकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे मुलगा आणि वडीलांचा शेततळ्यातत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुलगा पाय घसरून शेततळ्यात पडला होता. मात्र त्याला वाचवण्यात गेलेल्या वडीलाचाही पोहता येत नसल्याने मृत्यू झाला. तर पत्नीला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
सत्यवान शिवाजी गाजरे (वय २५) आणि राजवंश सत्यवान गजरे (दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर पत्नी स्नेहल सत्यवान गाजरे या महिलेला स्थानिकांनी बुडण्यापासून वाचवले. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूरजवळ पाचतळे येथे गाजरे कुटुंबीयांचे चरणंग बाबा कृषी पर्यटन केंद्र आहे. या पर्यटन केंद्रात खेळत असताना राजवंश हा २० फूट खोल असलेल्या शेततळ्यात पडला. यावेळी मुलाला वाचवण्यासाठी सत्यवान यांनी शेततळ्यात उडी मारली. मात्र पोहता येत नसल्याने तेही बुडाले.
आपल्या डोळ्यासमोर मुलगा आणि पती बुडत असल्याचे पाहून पत्नी स्नेहलनेही शेततळ्यात उडी मारली. मात्र, तीही बुडू लागल्याने आरडाओरड करत होती. यावेळी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी आवाज ऐकताच शेततळ्याच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत मुलगा आणि वडीलाचा मृत्यू झाला होता.