‘ती’चीही कुचंबणा

वाहनांनी आणि गर्दीने भरलेल्या पुण्यात स्वच्छतागृहांची वानवा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. अडचणीतून सुटका व्हावी यासाठी सर्वांना शोधमोहीम राबवावी लागते. लोकसंख्या आणि स्वच्छतागृहांची संख्या याचे प्रमाण कमालीच्या तफावतीचे असल्याने अडचणीतून सुटका होणे हे एक दिव्यच असते. त्यातही महिलांची होणारी ‘अडचण’ तर अधिक जटील. त्यावर काहीअंशी उत्तर शोधताना महापालिकेने २०१८ साली “ती” मोबाईल टॉयलेट बस सुरू केल्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 25 Feb 2023
  • 12:46 pm

‘ती’चीही कुचंबणा

शिक्षण, नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या ‘ती’ च्या सोयीसाठी ठेवलेल्या ११ पैकी ९ मोबाईल बस एकतर गायब किंवा धुळीत

तन्मय ठोंबरे/नितीन गांगर्डे

tanmay.thombre@civicmirror.in

TWEET@tanmaytmirror

वाहनांनी आणि गर्दीने भरलेल्या पुण्यात स्वच्छतागृहांची वानवा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. अडचणीतून सुटका व्हावी यासाठी सर्वांना शोधमोहीम राबवावी लागते. लोकसंख्या आणि स्वच्छतागृहांची संख्या याचे प्रमाण कमालीच्या तफावतीचे असल्याने अडचणीतून सुटका होणे हे एक दिव्यच असते. त्यातही महिलांची होणारी ‘अडचण’ तर अधिक जटील. त्यावर काहीअंशी उत्तर शोधताना महापालिकेने २०१८ साली “ती” मोबाईल टॉयलेट बस सुरू केल्या. एखादा नवा उपक्रम राबवताना सुरुवातीला असणारा उत्साह तातडीने मावळतो. याबाबतही तसेच झाल्याने ११ “ती” मोबाईल टॉयलेट बसपैकी ९ बस धूळखात पडल्या आहेत, तर केवळ दोनच सुरू आहेत.      

शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. गेल्या काही काळात पुणे कमालीच्या वेगाने वाढल्याने लोकसंख्येच्या तुलनेत शहरातील स्वच्छतागृहांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे नागरिकांची कमालीची कुचंबणा होते. ठराविक ठिकाणी जाणे-येणे असल्यास तेथे कोठे स्वच्छतागृहे आहेत याची कल्पना येते. मात्र, एखादा नवखा नागरिक त्या भागात गेला तर त्याला अडचणीतून मुक्त होण्यासाठी स्वच्छतागृहांचा शोध घ्यावा लागतो. त्यासाठी ज्या दिव्यातून जावे लागते त्याची कल्पना प्रत्येकाला कोठे ना कोठे कधी तरी येतच असते. पुरुषांना अशा दिव्यातून जावे लागत असेल तर महिलांना कोणत्या अडचणीतून जावे लागत असेल याची कल्पना केवळ त्याच करू शकतात. याबाबत महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. त्यातच बाहेरच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांतील स्वच्छता आणि तेथील सुविधांचा विचार केला तर अंगावर काटा येईल अशी स्थिती असते.

त्यामुळे घराबाहेर पडताना महिला संभाव्य स्थितीचा विचार करून बाहेर पडतात. घराबाहेर सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करण्याची एक प्रकारची धास्तीच त्यांच्या मनात असते. मासिक पाळीच्या काळात तर त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये म्हणून महिला विशेष काळजी घेतात. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केला तरी आणि गरज असतानाही तेथील अवस्था पाहून वापर केला नाही तरी आजाराची शक्यता अशी दोन्हीकडूनही महिलांची कुचंबणा होत असते.

मोबाइल टॉयलेटचा पर्याय 

महिलांची या अडचणीतून किमान गर्दीच्या ठिकाणी सुटका व्हावी यासाठी स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी विविध सामाजिक संस्था तसेच स्वयंसेवी संघटना करत होत्या. सार्वजनिक ठिकाणी जागेची अडचण असल्याने स्वच्छतागृह बांधण्यास अडचण होती. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने परदेशातील सोयीप्रमाणे शहरातही खास महिलांसाठी मोबाइल टॉयलेटची उभारणी केली. पुणे महानगर परिवहन महामंडळाने भंगारातील बस घेऊन त्यांचे रूपांतर मोबाइल टॉयलेटमध्ये केले गेले.  

 २०१८ मध्ये अशा भंगार ११ बसचे रूपांतर मोबाईल टॉयलेटमध्ये करण्यात आले. यामध्ये कमोड आणि साधे असे दोन पर्याय ठेवले गेले. फ्री वायफाय, पाण्याची बाटली, शीतपेय अशा वस्तूंचा छोटा स्टॉल, सोलर पॅनल अशा सोयीही उपलब्ध करून दिल्या गेल्या. महापालिकेने त्यांची जाहिरात करून स्वतःचे कौतुक करून घेतले. वारेमाप खर्च करून बनवलेली “ती” मोबाईल टॉयलेट बस ही स्वच्छतागृहे आज धूळखात पडली आहेत. ११ मोबाईल टॉयलेट बस स्वच्छतागृहांमधील ९ तर आज बंदच आहेत. मोबाईल टॉयलेट बस स्वच्छतागृहांकडे लक्ष द्यावयाचे नव्हते तर त्यासाठी एवढा खर्च केलाच कशाला असा संतप्त प्रश्न महापालिकेला महिला विचारत आहेत. शनिवारवाडा आणि शिवाजीनगर न्यायालया जवळील दोनच बस चालू आहेत. परंतू त्याही पूर्ण वेळ चालू नसतात. सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेतच चालू असतात. सायंकाळी सहानंतर स्वच्छतागृह वापरायला बंदी आहे का, असा प्रश्न महिला विचारत आहेत  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story