‘ती’ कलासक्त... ‘ती’ कलाशक्ती!

कला क्षेत्रातील विविध विभागांपैकी शिल्पकलेचे दालन कधीच फारसे गजबजलेले नसते. शिल्प साकारणारे शिल्पकार आणि या कलेचे रसिकही इतर कलांच्या तुलनेत संख्येने तसे कमीच दिसतात. मात्र, अशा स्थितीतही 'ति'ने शिल्पकार व्हायचं ठरवलं आणि महिला शिल्पकार म्हणून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 7 Mar 2023
  • 11:17 pm
‘ती’ कलासक्त...  ‘ती’ कलाशक्ती!

‘ती’ कलासक्त... ‘ती’ कलाशक्ती!

शिल्पकलेच्या प्रांतातील अनेक आव्हानांचा सामना करून ‘महिला शिल्पकार’ सुप्रिया शिंदे यांनी निर्माण केलं स्वतंत्र अस्तित्व

मयूर भावे

mayur.bhave@civicmirror.in

TWEET@mayur_mirror

कला क्षेत्रातील विविध विभागांपैकी शिल्पकलेचे दालन कधीच फारसे गजबजलेले नसते. शिल्प साकारणारे शिल्पकार आणि या कलेचे रसिकही इतर कलांच्या तुलनेत संख्येने तसे कमीच दिसतात. मात्र, अशा स्थितीतही 'ति'ने शिल्पकार व्हायचं ठरवलं आणि महिला शिल्पकार म्हणून स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. 

शिल्प साकारताना आधी माती आणि नंतर केमिकल हाताळल्याने हाताची त्वचा खराब होण्याची भीती, अंगमेहनतीचे काम, 

घर सांभाळून कामाला द्यावा लागणारा भरपूर वेळ आणि इतर कलांच्या तुलनेत मिळणारा कमी प्रतिसाद अशा विविध आव्हानांचा सामना करत सुप्रिया शिंदे साधारण १५ वर्षांपासून शिल्पकार म्हणून कार्यरत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा घेतलेला आढावा. 

» पान १ वरून

शिल्पकलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची संख्या अत्यंत कमी आहे. असे असूनही सुप्रिया शिंदे यांनी शिल्पकलेत काम करण्याचा निर्णय घेतला आणि केवळ महाविद्यालयीन शिक्षण नव्हे, तर त्या पलीकडे जाऊन त्यांनी या क्षेत्रात काम केले. त्या टिकून राहिल्या आणि आज १५ वर्षांहून अधिक काळ गेला, तरी त्या त्याच तळमळीने चिकाटीने काम करत आहेत.

| कलाप्रवास

आपल्या कलाप्रवासाबद्दल सांगताना सुप्रिया शिंदे यांनी सांगितले की, 'माझं माहेर मंचरचं आहे. माझ्या वडिलांचा गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचा कारखाना होता. मी लहानपणापासून मूर्ती तयार करण्याचं काम पाहिलं होतं. त्याच वातावरणात मी मोठी झाले. मला कळायला लागल्यावर मी वडिलांना मदत करू लागले. मूर्ती रंगवण्याचं काम मला खूप आवडायचं. मोठी झाल्यावर काही काळ मी एकटीने कारखान्याचं सर्व कामही पाहिलं आहे. त्यामुळे मला मूर्तीकामाची आवड होती आणि मी ते काम पाहिलं होतं. लग्न झाल्यानंतर माझा मुलगा तीन वर्षांचा असताना तुला काही शिकायची इच्छा आहे का, असा प्रश्न माझ्या नवऱ्याने विचारलं. मी त्यांना माझ्या शिल्पकलेच्या आवडीबद्दल सांगितलं. त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला आणि मी भारती विद्यापीठात जे. डी. आर्टला प्रवेश घेतला. तिथे मी शिल्पकला विषय घेऊन पाच वर्षे शिक्षण घेतलं. यात दोन वेळा माझा संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक आला. याच काळात आम्ही आंबेगावमध्ये स्टुडिओसाठी जागा घेतली. मधल्या काळात मी घरीदेखील काम करणं सुरू केलं होतं. '

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विश्वविक्रम

मंचर येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा १० फुटी पुतळा सुप्रिया यांनी साकारला आहे. अत्यंत कमी वेळात साकारलेला

एवढा भव्य पुतळा म्हणून त्याची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. शिंदे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, 'रोज साधारण १४ तास मी ह्या पुतळ्यासाठी काम करत होते. सलग ७५ दिवस काम केल्यावर तो पुतळा पूर्ण झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे मला दैवतासमान आहेत. त्यामुळे मी स्वतः तो पुतळा साकारताना अत्यंत भारावून गेले होते. पुतळ्यात जिवंतपणा यावा यासाठी मी कात्रजहून एक घोडा भाड्याने आणला होता. त्या जिवंत घोड्यासमोर मी त्याचे तसेच्या तसे शिल्प साकारले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शरीरयष्टीचा अंदाज येण्यासाठी काही पैलवानांना समोर ठेवून मी त्याच्या शरीरयष्टीवरून अंदाज घेऊन महाराजांचा पुतळा साकारला. महाराजांचे तेजस्वी डोळे, दाढी, जिरेटोप, घोड्याच्या मानेवरील केस अशा काही गोष्टी हुबेहूब साकारण्यात माझा खूप कस लागला. मात्र, या कामाने मला खूप मोठे समाधान दिले.

'पुन्हा मोडा, पुन्हा करा'

शिल्पकला हे अत्यंत चिकाटीचे आणि संयमाचे काम आहे. शिंदे म्हणाल्या की, 'जरा काही चूक झाली की, पुन्हा सगळं मोडावं लागतं. शिल्पकलेत खोडून आकार काढण्याची संधी नसते. आपण साकारत असलेला आकार मनासारखा आला नाही की, मातीचा गोळा पुन्हा एकत्र करायचा आणि पुन्हा नवा आकार त्यातून निर्माण करायचा. असं किती वेळा करावं लागेल, याची कल्पनाच करता येत नाही. मात्र, मनासारखं होत नाही, तोवर हे करत राहावंच लागतं. त्याला पर्याय नाही. कितीही तंत्रज्ञान प्रगत झालं, तरी मातीकाम करण्याशिवाय पर्याय नाही. ते करावंच लागतं. महाविद्यालयात आमच्याकडून हेच करवून घेतात. तिथे आमची संयमाची बैठक पक्की केली जाते आणि आमची चिकाटी वाढवली जाते. स्वतःला त्यात पूर्ण गाडून घेतल्याशिवाय कला जन्माला येत नाही, याचा अनुभव मी घेते आहे.'

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story