शास्तीकर रद्दचा आदेश काढणारच

भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या सरकारने पिंपरी-चिंचवडकरांसाठी नियमाच्या बाहेर जाऊन आंद्रा धरणातील २५० एमएलडी पाणी मंजूर केले आहे. वाढणाऱ्या शहराची गरज लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला होता. हे पाणी लवकरच शहरापर्यंत पोहोचणार आहे. त्यातून शहराची तहान भागवण्याचे काम निश्चितपणे पूर्ण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगवी येथील सभेत सांगितले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 25 Feb 2023
  • 01:27 pm
शास्तीकर रद्दचा आदेश काढणारच

शास्तीकर रद्दचा आदेश काढणारच

चिंचवड पोटनिवडणूक ः सांगवीतील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या सरकारने पिंपरी-चिंचवडकरांसाठी नियमाच्या बाहेर जाऊन आंद्रा धरणातील २५० एमएलडी पाणी मंजूर केले आहे. वाढणाऱ्या शहराची गरज लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला होता. हे पाणी लवकरच शहरापर्यंत पोहोचणार आहे. त्यातून शहराची तहान भागवण्याचे काम निश्चितपणे पूर्ण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगवी येथील सभेत सांगितले. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला नसता तर त्यांचा मोठेपणा दिसला असता. पण आता ठीक आहे, दिवंगत लक्ष्मणभाऊंची काय ताकद आहे? हे निवडणुकीतून आम्ही दाखवून देऊ, असे आव्हानही त्यांनी राष्ट्रवादीला दिले.

चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावरील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडिक, भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार राम सातपुते, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार, तुषार राठोड, प्रसाद लाड, माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, माजी खासदार अमर साबळे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शहराच्या जडणघडणीत लक्ष्मण जगताप यांचा वाटा होता. ही निवडणूक आलीच नसती तर आपल्या सगळ्यांना आनंद झाला असता. परंतु, कधी कधी नियती आपल्यावर काही गोष्टी लादत असते. २४ तास विकासाची कास धरणारा उमदा नेता, जनसामान्यांचा आवाज बनणारा नेता दुर्दैवाने आपल्यातून निघून गेला. निवडणूक अचानक आली. कोणाचीही मानसिक तयारी नव्हती. त्यांचे कार्य समर्थपणे नेण्यासाठी त्यांच्या मागे सावलीप्रमाणे उभ्या राहिलेल्या अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. दुःखाच्या काळातही लक्ष्मणभाऊंचे कार्य पुढे नेण्यासाठी त्या खंबीरपणे मैदानात उभ्या राहिल्या आहेत.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडिक, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांचीही भाषणे झाली.

लक्ष्मणभाऊंना श्रद्धांजली वाहावी…

आता मतदारांनी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना आशीर्वाद देऊन लक्ष्मणभाऊंना श्रद्धांजली वाहावी. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा केला नसता, तर त्यांचा मोठेपणा दिसला असता. पण आता ठीक आहे, दिवंगत लक्ष्मणभाऊंची काय ताकद आहे हे या निवडणुकीतून आम्ही दाखवून देऊ. त्यांच्यावर प्रेम करणारी जनता लक्ष्मणभाऊंच्या सावली असलेल्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांना अभूतपूर्व मतांनी विजयी करणार आहे. लक्ष्मणभाऊ म्हणायचे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आंतरराष्ट्रीय शहर बनण्याची ताकद आहे. त्यासाठी ते झटत होते. शहरातील वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करत होते.

शास्तीकराचा आदेश काढावाच लागेल

शास्तीकर रद्द व्हावा यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. मोगलांच्या काळातील जिझिया करासारखा केवळ पिंपरी-चिंचवडकरांवर हा कर लावण्यात आला होता. लोकांना मोठ्या प्रमाणात नोटीस पाठवणे सुरू केले होते. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे शासन होते. त्यांना अचानक स्वप्न पडले आणि शहरात शास्तीकर लावला. भाजप-शिवसेना महायुती सरकारने एक हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा शास्तीकर रद्द केला. नवीन सरकार आल्यानंतर लक्षात आले की एवढ्याने नागरिकांची सुटका होत नाही. त्यामुळे शास्तीसारखा जिझिया कर संपूर्णपणे रद्द करण्याची घोषणा विधानसभेत केली आहे. त्याचा शासन आदेश काढला नाही, तर सरकारवर हक्कभंग येतो. त्यामुळे विधानसभेत केलेल्या घोषणेचा शासन आदेश काढावाच लागतो. केलेल्या घोषणेप्रमाणे नक्कीच शासन आदेश काढून शास्तीकर संपूर्णपणे रद्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story