'शक्तिमान' मागचे किल्मिष

आरोग्यवर्धक पूरक आहाराची (फूड सप्लीमेंट) बाजारपेठ गेल्या काही वर्षांत वाढत असून कोविड काळात तर त्याची आणखी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे शहरामध्ये पूरक आहार उत्पादनांची विक्री करणारी दुकाने ठिकठिकाणी उघडली गेली. मात्र, ही उत्पादने शरीराला योग्य आहे की घातक याची तपासणी होण्याची गरज आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 11 Mar 2023
  • 06:57 am
'शक्तिमान' मागचे किल्मिष

'शक्तिमान' मागचे किल्मिष

आरोग्यपूरक आहाराची मागणी वाढल्याने गेल्या काही वर्षांत दुकानांची संख्याही वाढली आहे. पूरक आहाराची निर्मिती कोठे होते आणि कशी होते हे कोणाला माहीत नसते. विक्री तंत्र म्हणून आहाराबाबत वेगवेगळे दावे केले जातात. मात्र, हे दावे आणि आहार शरीराला योग्य आहे की घातक हे कळावयास काहीच मार्ग नाही.

विकी पठारे

feedback@civicmirror.in

आरोग्यवर्धक पूरक आहाराची (फूड सप्लीमेंट) बाजारपेठ गेल्या काही वर्षांत वाढत असून कोविड काळात तर त्याची आणखी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे शहरामध्ये पूरक आहार उत्पादनांची विक्री करणारी दुकाने ठिकठिकाणी उघडली गेली. मात्र, ही उत्पादने शरीराला योग्य आहे की घातक याची तपासणी होण्याची गरज आहे. मात्र, ही जबाबदारी असणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे (फूड ॲॅण्ड ड्रग ॲॅडमिनिस्ट्रेशन-एफडीए) पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे पूरक आहार उत्पादने विकणाऱ्या दुकानांची सखोल तपासणी करण्यास आपण असमर्थ असल्याची कबुली या विभागाने दिली आहे.

सर्वाधिक खप असलेल्या पूरक आहार उत्पादनांची राज्य अन्न-औषध नियंत्रण विभागाने केलेल्या पाहणीत पूरक आहार म्हणून विकल्या जाणाऱ्या प्रोटिन पावडरपैकी १५ टक्के पावडर ही कमी दर्जाची असल्याचे आढळले. या निष्कर्षाचा आधार घेत फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड ॲॅथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) ने सर्व राज्याच्या आणि केंद्रशासित प्रदेशाच्या अन्-औषध आयुक्तांना एक आदेश पाठवला. आरोग्यवर्धक  पूरक आहार उत्पादनाची निर्मिती ते विक्री या साखळी दरम्यान त्यांचा दर्जा आणि सुरक्षा राखली जाते की नाही हे तपासण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेण्यास त्यांना सांगण्यात आले. या तपासणीचा अहवाल मार्चअखेर सादर करण्यास त्यांना बजावण्यात आले होते. मात्र, ही कामगिरी आपण बजावू की नाही याविषयी पुणे विभागातील अन्न-औषध कार्यालय साशंक आहे. या मोहिमेंतर्गत तपासण्यात येणाऱ्या दुकानांची संख्या आणि आपल्याकडील मनुष्यबळ याचे प्रमाण विषम असल्याने ही जबाबदारी वेळेत पार पाडणे अवघड असल्याचे त्यांना वाटते.    

एफएसएसएआयने २०२१-२२ या आर्थिक वर्षात १ लाख ४५ हजार प्रोटिन पावडरच्या सॅम्पलची चाचणी केली. त्यावेळी यातील ४ हजार ८९० पावडर आरोग्याच्या दृष्टीने असुरक्षित होत्या, तर १६ हजार ५८२ पावडर खालच्या दर्जाच्या होत्या. कोणतेही नियंत्रण नसलेल्या प्रक्रियेतून बाहेर येणारी पूरक आहार उत्पादने खालच्या दर्जाची असतील तर त्याचा हृदय आणि किडनीवर वाईट परिणाम होईल, अशी भीती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. 

देशात मोठ्या प्रमाणावर विकली जाणारी आरोग्यवर्धक उत्पादने फूड सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड विधेयक २०२२ ( आरोग्य वर्धक, आहार पूरक, विशेष आहार नियंत्रित उत्पादने, वैद्यकीय कारणासाठीची आहार उत्पादने, प्रिबायोटिक आणि प्रोबायोटिक आहार) मधील अनेक तरतुदींचे पालन करून बनवली जात नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर एफएसएसएआयकडे आल्या होत्या.

एफएसएसएआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक उत्पादनांची बाजारपेठेत विक्री व्हावी म्हणून खोटी, दिशाभूल करणारी आणि अवास्तव माहिती लेबलवर छापलेली असते. 

अन्न-औषध प्रशासनाचा एक वरिष्ठ अधिकारी सीविक मिररच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाला की, प्रतिकारशक्ती वाढवणारी  पूरक आहारावरील लोकांचा विश्वास गेल्या काही काळात वाढला आहे. त्यामुळे अशा  पूरक आहाराला असणारी मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने शहरभर त्याची विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या ढिगभर वाढली आहे. गेल्या काही दिवसांत जिममध्ये आणि दुकानातून विकल्या जाणाऱ्या  पूरक आहारांची आम्ही तपासणी केली. १८ ते १९ ठिकाणी केलेल्या तपासणीत आम्हाला काही आक्षेपार्ह आढळले नाही.   

अन्न-औषध प्रशासन, पुणेचे संयुक्त आयुक्त अर्जुन भुजबळ म्हणाले की, एफएसएसएआयचा तपासणी मोहीम राबविण्याचा आदेश आम्हाला आला आहे. त्यानुसार आम्ही  पूरक आहाराचे उत्पादक, ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांची चौकशी करणार आहोत. या विक्रेत्यांची एका विशिष्ट वर्गवारीत नोंदणी झालेली नाही. आमच्याकडील तपशिलानुसार जवळ जवळ १ लाख ३० हजार विक्रेते असून त्यामध्ये  पूरक आहार विक्रेत्यांचाही समावेश आहे. तपासणीवेळी आम्ही सर्वांची तपासणी करणार आहोत. मात्र, आमच्याकडील मनुष्यबळ पाहता सर्वांची एकाचवेळी तपासणी होणे अशक्य आहे.  या  पूरक आहाराच्या विक्रीसाठी वेगवेगळी तंत्रे वापरली जातात. त्यामुळे सुरक्षित आणि एफएसएसएआयच्या तरतुदीनुसार  पूरक आहारांची निवड करणे अशक्य आहे. आमच्याकडे अन्य जबाबदारी असते. मात्र, गरजेप्रमाणे आम्ही कामांना प्राधान्य देतो. मात्र, एकावेळी सर्व  पूरक आहार विक्रेत्यांची चौकशी होणे अवघड आहे, हे खरं.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story