शिक्षण परिषदेच्या माजी अध्यक्ष शैलजा दराडेंना अटक
सीविक मिरर ब्यूरो
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी राज्य शिक्षण परिषदेच्या माजी अध्यक्ष शैलजा दराडे यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते.
दराडे यांच्यापूर्वी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेले तुकाराम सुपे यांनाही टीईटी घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण परिषदेचा कारभार शैलजा दराडेंकडे सोपवण्यात आला होता. मात्र शिक्षकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने दराडे यांनी लाखो रुपये जमा केल्याचा आरोप आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पोपट सूर्यवंशी या शिक्षकाकडून बहिणींना शिक्षिकेची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून प्रत्येकी १२ आणि १५ लाख रुपये घेतल्याचा शैलजा दराडेंवर आरोप आहे. दराडेंनी हे पैसे त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्या मार्फत हडपसर परिसरात घेतल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. मात्र पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने सूर्यवंशी यांनी पैसे परत मागितले असता शैलजा दराडे यांनी पैसे परत केले नाहीत. त्यामुळे सूर्यवंशी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणातील तक्रारदार पोपट सूर्यवंशी आणि शैलजा दराडे यांच्यात मोबाईलवरून २०१९ मधे झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लीप देखील समोर आली होती. यामध्ये शैलजा दराडे या फक्त शिक्षण विभागातच नाही तर आरटीओमधे जर कोणाला नोकरी हवी असेल तर आपण लावून देऊ शकतो, असे सांगत आहेत. गैरप्रकार समोर आल्यानंतर शिक्षण आयुक्तालयाने दराडेंना नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवला होता. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ७ जुलै २०२३ रोजी संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर केला. या अहवालात दराडेंच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. याची गंभीर दखल घेत त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
गैरव्यवहारात भावाचाही सहभाग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलजा उत्तम खाडे (पूर्वाश्रमीच्या शैलजा रामचंद्र दराडे) आणि दादासाहेब दराडे हे भाऊ-बहीण आहेत. शैलजा दराडे या राज्याच्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी असल्याचे सांगून दादासाहेब दराडे यांनी ४४ शिक्षक उमेदवारांचा विश्वास संपादन केला. सूर्यवंशी यांच्या दोन बहिणींना शिक्षिकेची नोकरी लावतो म्हणून २७ लाख रुपये घेतले.