शैलजा दराडे यांना पोलीस कोठडी
सीविक मिरर ब्यूरो
शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांची ४ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना मंगळवारी (दि. ८) न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दराडे भाऊ-बहिणींना या गुन्ह्यात मदत करणाऱ्या एका आरोपीचे नाव पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणात शैलजा दराडे यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोपट सुखदेव सूर्यवंशी (वय ५०, रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दादासाहेब दराडे यांना पोलिसांनी ४ एप्रिलला अटक केली होती, तर शैलजा दराडे यांना सोमवारी (दि. ७) सायंकाळी अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांना लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले होते.
आरोपीने पदाचा गैरवापर करून उमेदवारांना नोकरीस लावण्याचे आमिष दाखवत त्यांची फसवणूक केली. आरोपींनी ४४ जणांची ४ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे आतापर्यंत झालेल्या तपासातून स्पष्ट झाले आहे. फसवणुकीची रक्कम अद्याप आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेली नाही. फसवणूक केलेल्या रकमेची आरोपींनी कोठे विल्हेवाट लावली, याचा तपास करण्यात येत आहे.
आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच आणखी आरोपींची नावे पुढे येऊ शकतात. या दृष्टीने तपासासाठी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अंजली नवगिरे यांनी केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी दराडे यांना १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.