गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार
#पुणे
पुस्तक खरेदी करण्यासाठी पुण्यात आलेल्या तरुणीला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर त्या मुलीला विवस्त्र करून तिचे अश्लील व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ लाख ८६ हजार रुपये उकळले आहेत. या प्रकरणी तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
पिंपरीतील ३३ वर्षीय फहीम नईम सय्यद असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका २७ वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार बालगंधर्व रंगमंदिरासमोरील विजय लॉज येथे २ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार ते ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ पर्यंत तसेच ५ नोव्हेंबर २०२२ ते १९ जानेवारी २०२३ दरम्यान घडला. तक्रारदार तरुणी ही सांगलीतील आहे. पुस्तक घेण्यासाठी ती पुण्यात येत होती. त्या दरम्यान बसमध्ये तिची फहीम सय्यद याच्याशी ओळख झाली. त्याने आपली ट्रॅव्हल एजन्सी असल्याचे सांगितले. त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. त्यावरून त्यांच्यात संभाषण होऊ लागले. काही महिन्यांपूर्वी पुण्यात येत असताना त्याने तिला फोन केला. दोघांनी मिळून पुस्तकांची खरेदी केली आणि त्यानंतर जेवणाच्या बहाण्याने तिला बालगंधर्व चौकातील एका हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर तिला सॉफ्ट ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तिचे विवस्त्र अवस्थेतील व्हीडीओ
काढले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्याने तिला अश्लील व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिची बदनामी करणार, असे सांगून अनेकदा धमकावण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याकडे पैशांची मागणी केली. आपली बदनामी होऊ नये, म्हणून या तरुणीने कर्ज काढून त्याला महिनाभरात १६ लाख ८६
हजार रुपये दिले. तरीही त्याची मागणी थांबत नसल्याने तिने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी फहीम सय्यद याला अटक केली.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.