नांदेड फाट्याजवळ झाले सांडपाण्याचे तळे
#किरकटवाडी
सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ असलेल्या कालव्यावरील पुलालगत अक्षरशः सांडपाण्याचे तळे साचले आहे. अनेक दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर साचून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनचालकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही ही समस्या कायम असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
सिंहगड रस्त्यावरील दळवी वस्तीकडून धायरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध असलेली सांडपाण्याची वाहिनी अनेक दिवसांपासून तुंबलेली आहे. परिणामी चेंबरच्या झाकणातून सर्व घाण रस्त्यावर येऊन तळे तयार झाले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून सांडपाण्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की ते मुख्य सिंहगड रस्त्यावर आले आहे. धायरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सांडपाण्याचे अक्षरशः तळे तयार झाले असून मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. तीस ते चाळीस फुटांपेक्षा जास्त रुंद असलेला रस्ता दोन्ही बाजूंना केवळ दोन ते तीन फूट शिल्लक असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. यापूर्वीही नागरिकांनी येथील सांडपाण्याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र अद्याप पालिकेला उपाययोजना करता न आल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. संपूर्ण रस्त्यावर सांडपाणी आलेले आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वाहतुकीसही अडथळा निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने तातडीने ही समस्या सोडविणे आवश्यक आहे. येथील सांडपाण्याची वाहिनी अत्यंत जुनी असल्याने ती वारंवार तुंबत आहे. अनेक वेळा दुरुस्ती करण्यात आली मात्र उपयोग होत नाही. ही पूर्ण सांडपाणी वाहिनी बदलणे आवश्यक असल्याचे मुख्य खात्याला कळवल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.