पिंपरी-चिंचवडमध्ये वरिष्ठ पोलिसांची ड्यूटी रात्री १२ पर्यंत
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल, तसेच अन्य दुकानांवर कारवाई करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आता रात्री बारापर्यंत स्वत:च्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत थांबणार आहेत.
पोलिसांच्या कामकाजाचे निश्चित तास नाहीत. कर्मचाऱ्यांना १२ तासांची 'ड्यूटी' देण्यात आलेली असते, तर वरिष्ठ निरीक्षक आणि निरीक्षक हे सकाळी आठ ते रात्री ९ या कालावधीत आपापल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फिरून गुन्हे घडणार नाहीत याची खबरदारी घेत असतात. त्यानंतर रात्री ९ ते सकाळी ९ या कालावधीत साहायक निरीक्षक पदावरील अधिकारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असतो. याबरोबरच साहायक आयुक्तांच्या विभागात एक वरिष्ठ निरीक्षक, उपायुक्तांच्या परिमंडळात वरिष्ठ निरीक्षक अथवा साहायक आयुक्त पिंपरी-चिंचवडमध्ये रात्रगस्तीवर असतात. परंतु, आता सर्वच पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांनीदेखील रात्री बारापर्यंत आपापल्या भागात फिरून सुरू असलेली हॉटेल, रेस्टॉरेंट, तसेच अन्य दुकाने बंद झालीत ना याची खात्री करून मगच घरी जायचे, असे आदेश अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे वरिष्ठ निरीक्षकांच्या दैनंदिन कामकाजाचा वेळ तीन तासांनी वाढला असला, तरी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटतो आहे.
शहरातील आयटी पार्क, नव्याने विकसित झालेला पिंपळे सौदागर-रहाटणी परिसर, झपाट्याने विकसित होत असलेला मोशी-स्पाईन रोड आदी परिसरात नागरिकांची रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. त्याचबरोबर वाकड परिसरातील काही हॉटेल उशिरापर्यंत सुरू राहात असल्याच्या कारणावरून वादाचे प्रसंग यापूर्वी घडले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी पिंपरीगावातील एका मेडिकल शॉपमध्ये सशस्त्र टोळक्याने घुसून तेथील कामगारावर कोयत्याने खुनी हल्ला चढविला होता. या प्रकरणी आठ लोकांना कालांतराने अटक करण्यात आली. परंतु, २४ तास मेडिकल शॉप, हॉस्पिटल या अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य काही दुकानेदेखील उशिरापर्यंत सुरू राहात असल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांची वर्दळदेखील वाढताना दिसून आली आहे. रात्री साडे दहा ते बारापर्यंत सर्व दुकाने बंद करण्याचे काम यापूर्वी त्या पोलीस ठाण्यातील साहायक निरीक्षक किंवा गस्तीवरील कर्मचारी करीत होते. आता परिसराचा प्रमुख असणाऱ्या वरिष्ठ निरीक्षकानेच गस्त घालून ही दुकाने बंद केल्यास अनेक गुन्ह्यांना अटकाव बसण्याची शक्यता आहे.
आयुक्तालयांतर्गत शहराबरोबरीनेच देहूरोड, तळेगाव, आळंदी, चाकण हा ग्रामीण भाग आणि एमआयडीसीचा बराचसा भाग येतो. त्यामुळे नागरिकांच्या रोबरीनेच कामगार आणि ग्रामीण भागातील लोकांचा रात्रभर परिसरात वावर असतो. त्यामुळे शहरातील अन्य भागातून या हॉटेलमध्ये जाणाऱ्यांची संख्यादेखील जास्त असून, तेथून परतताना अपघात होण्याचेही प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये सर्रारपण घडत आहेत. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विविध ठिकाणी प्रवास करणाऱ्यांच्या सोयीसाठी हायवे-वर काही ढाबे-हॉटेल असतात. मात्र, तेथे स्थानिकांचीच गर्दी अधिक होत असल्याने रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री होत असून, त्यातून वादाचे प्रसंग उद्भवतात, हे आता शहरालाही नवे नाही. या सगळ्या गोष्टींसह शहरांतर्गत कायदा-सुव्यवस्था राखताना पोलिसांचीच कसरत होत आहे. पोलिसांकडे कमी मनुष्यबळ असल्यानेदेखील हा निर्णय घेतला गेल्याचे बोलले जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.