नंबर प्लेटवरील ‘आई’चा शोध घेत गोळीबार करणाऱ्यास घातल्या बेड्या
#स्वारगेट
तंबाखूचा व्यापार करणाऱ्यावर गोळीबार करून चार लाखांची रोकड हिसकावणाऱ्या चोरट्याला पर्वती पोलिसांना अटक केली. स्वारगेट भागात ही घटना घडली होती. वाहन क्रमांकाच्या पाटीवर लिहिलेल्या नावावरून पोलिसांनी तपास करून गोळीबार करणाऱ्या आरोपीला पकडले. सूरज वाघमोडे (वय २१, रा. भुंडे वस्ती, बावधन) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वाघमोडे मार्केट यार्डात मजुरीचे काम करतो. चार दिवसांपूर्वी मंडई भागातील तंबाखू व्यापारी घरी परत जात असताना श्री गणेश कला क्रीडा मंच परिसरात आरोपी वाघमोडे आणि साथीदारांनी तंबाखू व्यापाऱ्यावर पिस्तुलातून गोळीबार केला होता. व्यापाऱ्याकडील चार लाखांची रोकड असलेली पिशवी हिसकावून वाघमोडे आणि साथीदार पसार झाले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात पसार झालेल्या वाघमोडेच्या वाहन क्रमांकाच्या पाटीवर आई असे लिहिले होते. पोलिसांच्या पथकाने शोध घेऊन वाघमोडेला मार्केट यार्ड भागात पकडले.
या व्यापाऱ्याचे मंडई परिसरात तंबाखू विक्रीचे दुकान आहे. दिवसभर जमा झालेली रोकड घेऊन व्यापारी दुचाकीवरून घरी जात होता. तो सिंहगड रस्ता भागात राहायला असून वाघमोडेने गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर पाळत ठेवली होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे. पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील जगदाळे, हवालदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, नवनाथ भोसले, दयानंद तेलंगे पाटील, प्रशांत शिंदे, किशोर वळे, अनिस तांबोळी आदींनी ही कारवाई केली.
feedback@civicmirror.in