'डब्ल्यू-१८ स्पोर्ट्स युनिव्हर्स'च्या गरजू खेळाडूंना देणार शिष्यवृत्ती
#पुणे
डब्ल्यू-१८ स्पोर्ट्स युनिव्हर्समध्ये शिकणाऱ्या गुणवंत व गरजू खेळाडूंच्या जडणघडणीत कोणताही अडसर येऊ नये, यासाठी पुणे डिस्ट्रीक्ट मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनच्या माध्यमातून खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा नुकतीच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर पॅन कार्ड क्लब रोड, बाणेर येथील अद्ययावत बॅडमिंटन अकॅडमीचे उद्घाटन चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुढे पालकमंत्री पाटील म्हणाले की, ऋषिकेश कुलकर्णी यांनी बॅडमिंटन खेळाडूंसाठी उत्तम प्रकारची सुविधा या अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी त्यांचे मी अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो.
यावेळी व्यासपीठावर`लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड`चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर, पुणे डिस्ट्रीक्ट मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सीए रणजीत नातू, एचएसबीसी असेट मॅनेजमेंट कंपनीचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर तुषार प्रधान, ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी बॅडमिंटनपटू निखील कानेटकर आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी साहित्य, कला-क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी तुषार प्रधान यांनी खेळामध्ये एकाग्रता कशी महत्त्वाची आहे, त्या संदर्भाने अकॅडमीमध्ये उपलब्ध करून दिला जाणाऱ्या सुविधा किती उपयोगाच्या ठरतील याबाबतची माहिती दिली. `लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड`चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर म्हणाले की, कोणतेही कौशल्य, विशेषत: क्रीडा कौशल्य आत्मसात करताना गुरू किंवा प्रशिक्षकांचे स्थान महत्त्वाचे असते. या संदर्भाने विवेचन करताना त्यांनी जुन्या काळातील बॅडमिंटनपटूंच्या काही आठवणीसुद्धा सांगितल्या.
खेळाडूंच्या विकासासाठी ऋषिकेश कुलकर्णी यांनी सुरू केलेली ही अद्ययावत अकॅडमी चांगले खेळाडू घडवेल, असा आशावाद बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव रणजीत नातू यांनी व्यक्त केला. पॅन कार्ड क्लब रोड, बाणेर, बालेवाडी भागातील क्रीडाप्रेमींसाठी गुणवत्तापूर्ण व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व कोचकडून बॅडमिंटन प्रशिक्षण मिळवण्यासाठी या अकॅडमीच्या रूपाने मोठी संधी उपलब्ध झाली आहे. डब्ल्यू-१८ स्पोर्ट्स युनिव्हर्स या अद्ययावत बॅडमिंटन अकॅडमीमध्ये सहा बॅडमिंटन कोर्ट असून राष्ट्रीय स्तरावरील कोच, जिम, फिजिओथेरेपी, मेडिटेशन, स्पोर्ट्स मसाज, स्पोर्ट्स शॉप, मेडिटेशन व योगा, अॅथलिट पिक परफॉर्मन्स लॅब, कॉगनेटिव्ह लॅब, कॅफेटेरिया आदी सुविधाही इथे उपलब्ध असणार आहेत. सर्व क्रीडाप्रेमींनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऋषिकेश कुलकर्णी व अकॅडमीच्या संचालिका प्रिथा कुलकर्णी यांनी केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.