म्हणे स्थानकावर ताण, सात किमी दूरच थांब

पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्याच्या नावाखाली मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना पुन्हा एकदा झटका देण्यात आला आहे. सहा लोणावळा लोकल शिवाजीनगरला हलवल्यानंतर आता दौंड डेमू आणि सोलापूर डेमू या दोन गाड्या हडपसर स्थानकातून सोडण्यात येणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 2 Mar 2023
  • 01:27 pm
म्हणे स्थानकावर ताण, सात किमी दूरच थांब

म्हणे स्थानकावर ताण, सात किमी दूरच थांब

लोकलपाठोपाठ दौंड, सोलापूर डेमू गाड्या हडपसर स्थानकातून सोडण्याचा निर्णय, रेल्वे प्रवाशांची धावपळ वाढणार

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्याच्या नावाखाली मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना पुन्हा एकदा झटका देण्यात आला आहे. सहा लोणावळा लोकल शिवाजीनगरला हलवल्यानंतर आता दौंड डेमू आणि सोलापूर डेमू या दोन गाड्या हडपसर स्थानकातून सोडण्यात येणार आहेत.

काही दिवसांपूर्वी पुणे स्थानकातून सुटणाऱ्या सहा लोणावळा लोकल शिवाजीनगरला हलविण्यात आला. आता दौंड आणि सोलापूर डेमू या दोन गाड्या हडपसर स्थानकातून सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शिवाजीनगरच्या तुलनेत हडपसर ते पुणे स्थानकामधील अंतर खूप असल्याने या मार्गांवरील प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार, सोमवारपासून (दि. ६ ) पुणे ते सोलापूर (११४२१) आणि दौंड ते पुणे (०१५२२) या दोन डेमू गाड्यांना हडपसर स्थानकातून सोडण्यात येतील. सोलापूर डेमू  सकाळी ८.३५ वाजता हडपसर स्थानकातून सुटेल. त्यापूर्वी दौंड डेमू ही गाडी सकाळी ७.३५ वाजता हडपसर स्थानकात पोहचेल. या दोन्ही गाड्यांना पुण्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. आता या गाड्यांनी पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना हडपसर स्थानकातूनच ये-जा करावी लागणार आहे. पुणे रेल्वे स्थानकातील सुविधांवर सध्या ताण वाढत असल्याने हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

याविषयी बोलताना दौंड-पुणे प्रवासी संघटनेचे सचिव विकास देशपांडे म्हणाले, ‘‘रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेताना प्रवाशांचा विचारच केलेला नाही. पुणे स्थानकातील ताण कमी व्हावा... त्याचा पुनर्विकास व्हावा, याबाबत दुमत नाही. आम्हाला पुणे स्थानकाचा विकास हवा आहे. पण हे करत असताना प्रवाशांची मोठी गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेणे अपेक्षित आहे. याबाबत आम्ही रेल्वे अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते. बहुतेक प्रवासी पुण्यात येणारे असतात. त्यामुळे अचानक घेतलेल्या या निर्णयाने नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक, या सर्वांची गैरसोय होणार आहे. त्यांना हडपसर स्थानकातून पुन्हा बस किंवा इतर पर्यायी व्यवस्था करून आपल्या कामाच्या ठिकाणी जावे लागेल. तर काहींना इतर रेल्वेगाड्यांनी प्रवास करणे भाग पडेल. त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन कामांवर तसेच वेळापत्रकावर होणार आहे.’’

रेल्वे अधिकाऱ्यांकडून या निर्णयाचे समर्थन केले जात आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर म्हणाले, ‘‘सध्या पुणे रेल्वे स्थानकावर मोठा ताण आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. तसेच पुढील काळात स्थानकाचा पुनर्विकास करण्याचे प्रस्तावित आहे. त्याबाबतची प्रक्रियाही सुरू आहे. त्यासाठी स्थानकातील काही गाड्या टप्प्याटप्याने हडपसर किंवा इतर स्थानकात हलविल्या जात आहेत. हे काम सुमारे २८० दिवस चालणार आहे. अचानक प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आतापासूनच गाड्यांचे नियोजन केले जात आहे.’’ प्रवाशांनी  यासाठी रेल्वेला सहकार्य करावे, असे आवाहन झंवर यांनी केले.

प्रवासी संघटनांनी मात्र प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. देशपांडे म्हणाले, ‘‘विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांच्याशी याबाबत बोलणे झाले आहे. हडपसरहून पुणे स्थानकात येण्यासाठी त्यावेळेत लोणावळा लोकल हडपसरपर्यंत सोडण्याची विनंती केली आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल. अन्यथा प्रवाशांमधीय नाराजी वाढू शकते. पुढील आठवडाभरात याबाबत निर्णय न घेतल्यास आम्ही रेल रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांना दिला आहे. याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.’’

पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम पुढील काही दिवसांत सुरू होणार आहे. हे काम नऊ महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये फलाटांची लांबी वाढविणे हे प्रमुख काम आहे. तसेच इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. या कामांसाठी शिवाजीनगर, हडपसर आणि खडकी स्थानकांचा पर्यायी स्थानके म्हणून विचार केला जात आहे. त्यानुसार आतापासून नियोजन केले जात आहे. या स्थानकातून आणखी काही गाड्या सोडण्याचे नियोजन असल्याचे समजते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story