सावित्रीबाईंची शाळा राष्ट्रीय स्मारक!
नितीन गांगर्डे
मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (२८ फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर असलेल्या भिडेवाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न विरोधकांनी उचलून धरला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करणार, असे आश्वासन दिले. अनेक वर्षांपासून घोषणा होऊनही भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न प्रलंबित होता.
पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत २००६ मध्ये भिडेवाड्याची जागा राष्ट्रीय स्मारक करण्याबाब एक ठराव मांडण्यात आला होता. यानंतर २००८ मध्ये स्थायी समितीने या जागेचे भूसंपादन करण्यास मान्यता दिली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादनाच्या कारवाईस सुरुवात झाली. भिडेवाड्यातील भाडेकरूंनी या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित होते. यावर अनेकदा चर्चा झाल्या. परंतु निर्णय होत नव्हता. मंगळवारी विधानसभेत विरोधी पक्षांनी हा विषय पुन्हा एकदा उचलून धरला. यावर ‘‘१० मार्चपर्यंत भाडेकरूंचा प्रश्न मार्गी लावून त्यांचा रेडीरेकनर आणि बाजारभावाप्रमाणे जो काही मोबदला आहे तो द्या,’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१ जानेवारी १८४८ रोजी सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांनी बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत सावित्रीबाई स्वतःच शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून काम करत होत्या. शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून काम करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला असा त्यांचा उल्लेख केला जातो. मुलींसाठी शाळा उघडणे त्याकाळी क्रांतिकारी पाऊल होते. सावित्रीबाईंची ही कृती त्या काळाच्या सामाजिक व्यवस्थेला आव्हान देणारी होती. या शाळेत धार्मिक ग्रंथांच्या अध्यापनाऐवजी गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यासारख्या विषयांचे अध्यापन केले जात होते. या घटनेला अनेक वर्षे लोटली. देशातील स्त्रीशिक्षणाचे रोपटे ज्या ठिकाणी लावण्यात आले, त्या जागेची आज दुरवस्था झाली आहे. या वाड्याचा पाया आता खचला आहे. भिंतींची, छताची पडझड झाली आहे. कुणीच लक्ष देत नसल्याने हे ठिकाण आता मद्यपींचा अड्डा झाले आहे. ही सर्व परिस्थिती फुले दाम्पत्याच्या कार्याप्रती कृतज्ञता बाळगणाऱ्यांसाठी वेदनादायी होती.
भिडेवाडा १९९० च्या दरम्यान पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेकडे तारण ठेवण्यात आला होता. २००० मध्ये तो मंत्री किशोर असोसिएट्सला विकला गेला. २०१७ मध्ये ‘भिडे वाडा वाचवा’ मोहीम सुरू झाली. तेव्हापासून सरकारला हे ठिकाण राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्याचे आवाहन केले जात होते. परंतु याकडे दुर्लक्ष होत होते. या वास्तूचे जतन करून राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी लावून धरली. यासाठी आढाव हे भिडेवाड्याबाहेर उपोषणाला बसले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.