सुटी चॉकलेट-बिस्किटे कंपन्या िवकतात स्वस्त, मात्र बॉक्समध्ये तीच उत्पादने पडतात २५% महाग, लुटीिवरोधात ग्राहक संघटना आक्रमक
व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या दिवसाचे सेलिब्रेशन चॉकलेट्सने करण्याची प्रथा अलीकडच्या काळात पडली आहे. मात्र सावधान, अशा चॉकलेट्सचा विशेष बॉक्स आपल्या खिशाला भुर्दंड बसवू शकतो. तीच बाब बिस्किट पुड्यांचीदेखील आहे. किरकोळ बाजारात ७ चॉकलेट घेतल्यास ती २५५ आणि बॉक्समध्ये ३०० रुपयांना मिळतात, तर किरकोळीत मिळणारी १२० रुपयांची बिस्किटे २०० रुपयांनी विकली जात आहेत. वरवर पाहता ही गोष्ट किरकोळ वाटत असली तरी याची उलाढाल कोट्यवधींची असल्याने ग्राहकांच्या खिशातून नाहक पैसे या कंपन्यांच्या तिजोरीत जमा होत आहेत. या लुटीविरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत आक्रमक झाली आहे.
चॉकलेट्सने आनंद साजरा करायची सवय कॉर्पोरेट जगताने आपल्याला लावली आहे. म्हणून ‘कुछ मीठा हो जाए...’ म्हणत विविध सण, समारंभ, वाढदिवस चॉकलेट्सने तोंड गोड करून साजरे करण्याची प्रथा वाढत आहे. दिवाळी आणि दसऱ्यासाठी तर विशेष जाहिरातही केली जाते. व्हॅलेंटाईन डे हा दिवस चॉकलेट कंपन्यांसाठी दिवाळीच असतो. या निमित्ताने विक्री करण्यात येणाऱ्या बॉक्समध्ये बाजारातील आपली वेगवेगळी उत्पादने एकत्र करून दिली जातात. त्यानंतर वेष्टनाच्या नावाखाली अधिकचे पैसे आकारले जात आहेत.
मॉल्स अथवा मल्टिप्लेक्समध्ये गेल्यास कोल्ड्रिंक अथवा पाण्यासाठी अवाच्या सवा पैसे आकारले जातात. बांधकाम नियमानुसार आवश्यक पार्किंग ग्राहकांना देणे हा त्यांचा हक्क असतानाही त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. वर, वाहनाच्या सुरक्षेची जबाबदारीही मालकावरच टाकली जाते.
कधी पाण्याची बाटली थंड देतो म्हणून त्यावर परस्पर छापील किमतीपेक्षा अधिक पैसे घेतल्याची उदाहरणेदेखील आहेत. यात एकटा ग्राहक काहीच करू शकत नाही. मुकाट्याने तो पैसे भरून संबंधित वस्तू अधिक मोल देऊन घेतो.
तसाच, काहीसा प्रकार काही नामांकित चॉकलेट्स आणि बिस्किट कंपन्या करीत आहेत.
ग्राहक पंचायतीने दिलेल्या माहितीनुसार, बॉक्सवर नेट वेट ३३२ ग्रॅम असे छापलेली ३०० रुपये वजनाची पाकिटे बाजारात आणली आहेत. त्यात सर्व करांसहित आणि एमआरपी इन्क्लुड्स प्राईस ऑफ गिफ्ट कार्टून-पॅकेजिंग अशा पद्धतीने एमआरपी प्रिंट केली जाते. बॉक्स आणि पॅकेजिंगचा खर्च ग्राहकांडून वसूल केला जात आहे. या बॉक्समध्ये सात चॉकलेट असतात. त्यावरील एमआरपीनुसार २५५ रुपये किंमत होते. ती किंमत संबंधित बॉक्सवर छापली जात नाही. उलट ३०० रुपये दर छापून त्याची विक्री केली जाते. तसाच प्रकार बिस्किटांच्या विशेष पॅकिंगचा आहे. एक कंपनी १२० रुपये एमआरपी असलेले बिस्किट पुडे २०० रुपयांना विकते. यातील वाढीव किंमत का आणि कशाच्या आधारावर घेतली याची माहिती ग्राहकाला दिली जात नाही. ती, समजूनही येत नाही.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे अध्यक्ष विलास लेले हे ऑक्टोबर २०२२ पासून या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे. संबंधित चॉकलेट कंपनी आणि वैधमापन शास्त्र विभागाकडे त्यांनी याबाबत विचारणा केली आहे. मात्र, त्यातून दोघांनाही समाधानकारक उत्तर देता आले नसल्याचा दावा लेले यांनी केला आहे. याबाबत ते म्हणाले, ‘‘ग्राहक एक ग्रॅम चॉकलेटसाठी एक रुपया १० पैसे मोजतो. त्यानंतरही त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर दिले जात नाही. त्यांनी बॉक्सवर कस्टमर केअर आणि मेल आयडी दिला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांचे नाव व फोन क्रमांक दिले जात नाहीत. आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाला अत्यंत मोघम उत्तर दिले गेले आहे. ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना यातील बारकावे लक्षात घ्यावे. ग्राहकांनीच पुढाकार घेऊन अशा मालावर बहिष्कार टाकावा.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.