सोशल मीडियावरील विरोधकांची भाजपला धास्ती
#नाशिक
राजकीय प्रचारासाठी सोशल मीडियाचा अत्यंत कुशलपणे वापर करत २०१४ आणि २०१९ ला विरोधकांना धोबीपछाड देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मीडियावरील प्रचारतंत्रात आपण कमी पडतो आहे की काय अशी धास्ती वाटत असल्याचे दिसते. येती दोन वर्षे निवडणुकीची असल्याने ही लढाई आता सोशल मीडियावर खऱ्या अर्थाने लढली जाणार आहे. सोशल मीडिया प्रचार तंत्रात अग्रेसर असणाऱ्या भाजपला याचे महत्त्व खरं तर समजावून सांगण्याची गरज नाही. मात्र, सध्या या प्रचारतंत्राचे महत्त्व विरोधी पक्षांनाही समजले असून तेही आता सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. सोशल मीडियाचा अवकाश विरोधकही व्यापत असल्याने त्याची दखल भाजपने घेतली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची नुकतीच नाशिकमध्ये बैठक झाली. बंद दाराआड झालेल्या चर्चेतील काही भाग बाहेर आला आहे. या वेळी समाजमाध्यमावर कितीजणांची खाती आहेत, त्यावर कितीजण दररोज संदेश टाकतात, पंतप्रधान, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे ट्वीट कितीजण रीट्विट करतात असा प्रश्नोत्तरांचा तास रंगला. मात्र, याला अपेक्षित प्रतिसाद आला नसल्याने माध्यमांवर सक्रिय नसणाऱ्यांना कठोर तंबी देण्यात आली.
आगामी निवडणुका या सोशल मीडियावरील प्रचार तंत्र आणि वातावरण निर्मितीवर लढल्या जातील. सोशल मीडियावरील विरोधकांना सामोरे जाण्यासाठी आपले अस्तित्व अधिक भक्कम करण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागणार असल्याची भाजपला जाणीव झाली आहे. कार्यकारिणीत अनेक विषयांवर चर्चा झाली असली तरी मुख्य मुद्दा हा निवडणुकांसाठी रणनीती हा होता. लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ आणि विधानसभेच्या २०० जागांचे लक्ष्य गाठण्यासाठी महाविजय २०२४ अभियानाचा संकल्प करण्यात आला. अभियान यशस्वी करण्यासाठी मतांचे समीकरण विस्तारण्यासाठी काय करता येईल, त्यासाठी कसे नियाेजन करता येईल यावर सविस्तर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांनी आमदार, खासदार, प्रदेश, जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. स्थानिक पातळीवर राज्यभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा देण्यात आली. सोशल मीडियावर विरोधकही आपला अवकाश व्यापत असल्याने तो आपल्याला त्रासदायक ठरू शकेल याची भाजपला जाणीव झाल्याचे दिसून आले. त्याचे अप्रत्यक्ष प्रतिबिंब राजकीय ठरावातही उमटले. हा प्रस्ताव मांडताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विविध विषयांवर संभ्रम निर्माण करणारे राजकीय शुक्राचार्य मोठ्या संख्येने आसपास असून त्यांच्यापासून जनतेने सावध राहण्याची गरज आहे. या राजकीय शुक्राचार्यांपासून जनतेला वाचविण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.
वृत्तसंंस्था
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.