सोसायटीच्या ग्रुपमध्ये राजकीय पोस्टवर बंदी
रोिहत आठवले
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@RohitA_mirror
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून, ज्या सोसायटीच्या मतदारांवर ही निवडणूक अवलंबून आहे त्याच सोसायटी फेडरेशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर राजकीय प्रचाराला आता मनाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील झपाट्याने विकसित होणाऱ्या पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड परिसरातील हाउसिंग सोसायटीच्या चेअरमन-सेक्रेटरी यांनी एकत्र येऊन पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची स्थापना केली. एकट्या सोसायटीला एखादा प्रश्न सोडविताना अडचणी निर्माण झाल्यास फेडरेशन मदत करते. त्याच बरोबर सांघिक पातळीवर फेडरेशन कडून कचरा, पाणी, अतिक्रमण तसेच अन्य अनेक प्रश्न मार्गी लावले जात आहेत.
मात्र, आता फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचे राजकीय मतमतांतरे उघड होऊ लागली आहेत. फेडरेशनने आपले सदस्य असलेल्या सर्व सोसायटींच्या चेअरमन, सेक्रेटरी आणि फेडरेशनचे पदाधिकारी यांचे पाच ते सहा व्हॉट्सॲप ग्रुप बनविले आहेत. दैनंदिन समस्यांवर चर्चा तसेच विचार विनिमय यासाठी तयार करण्यात आलेल्या याच ग्रुप वर आता राजकीय हेवेदावे सुरू झाले आहेत.
फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून राजकीय व्यक्तींना दिले जाणारे झुकते माप या मुद्यावरून अंतर्गत वाद असल्याचे दिसून आले आहे. मध्यंतरी सोसायटी फेडरेशनचा एका व्हाट्सॲप ग्रुपवर आजी-माजी अध्यक्ष यांनी राजकीय हेतुतून केलेल्या पोस्टनंतर एकमेकांना टोमणे मारले होते.
दोघांनी एकमेकांना केलेल्या मेसेजमुळे आणि त्यावरील प्रतिक्रियांमुळे व्हाट्सॲप ग्रुपच्या या चर्चेची नवी चर्चा शहरातील हाऊसिंग सोसायटीमध्ये रंगली होती. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने तयार केलेल्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर पोटनिवडणूक होईपर्यंत राजकीय पोस्ट, मेसेज, प्रचार स्वरूप चर्चा होऊ नये अशा स्वरूपाचा मेसेज टाकण्यात आला आहे. तसेच पोटनिवडणूक संपेपर्यंत या ग्रुपवर राजकीय पोस्ट टाकण्यात आल्यास संबंधितांना ग्रुपमधून काढून टाकण्यात येईल, असेही सूचित करण्यात आले आहे.
चिंचवड मतदारसंघातील एकूण मतदारांपैकी ७० टक्के मतदान हे सोसायटीत राहणाऱ्या उच्चशिक्षित नागरिकांचे आहे. तर उर्वरित मतदान हे चिंचवडगाव आणि अन्य जुन्या भागातील सुशिक्षित नागरिकांचे आहे. सुशिक्षित मतदार अशी चिंचवड मतदारसंघाची महाराष्ट्रात ओळख आहे. सोसायटीतील नागरिकांकडून निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान होत असते.
सोसायटीचे आपापले व्हॉट्स ॲप ग्रुप आहेत. त्यामध्ये सोसायटीतील विंग नुसार आणि एक कॉमन असे ग्रुप आहेत. यामध्ये अंतर्गत कामकाजासाठी या ग्रुप चा वापर होत असतो. सोसायटीच्या अंतर्गत ग्रुप वर राजकीय प्रचाराबाबत प्रत्येक सोसायटीने वेगवेगळे निर्णय घेतले आहेत. परंतु, सर्व सोसायटीच्या चेअरमन-सेक्रेटरी यांच्या एकत्रित ग्रुप मध्ये मात्र राजकीय प्रचाराला रोक लावण्यात आला आहे.
काही पदाधिकारी राजकीय हेतूने छुपा प्रचार करताना दिसत आहेत. ‘स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक उमेदवार हवा‘ ते ‘आतापर्यंत आपल्यासाठी कोण आले?’ अशा प्रकारचे मेसेज फेसबुकवर शेअर करून काही पदाधिकारी छुपा प्रचार करताना दिसत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.