सांगवी पोलिस ठाणे भाजीच्या गाळ्यातच
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
सांगवी परिसरातील पोलिसांना अकरा वर्षांनंतरही पत्र्याच्या खोलीत आणि व्यापारी गाळ्यात बसून कामकाज करावे लागत असल्याची विदारक वस्तुस्थिती समोर आली आहे, तर दुसरीकडे पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या चिखली पोलीस ठाण्यासाठी मात्र नऊ हजार चौ. फूट जागा मंजूर झाली आहे. त्यामुळे चिखली तुपाशी, पण सांगवी पोलीस मात्र उपाशीच असे म्हणण्याची वेळ आली आहे.
पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होण्यापूर्वी शहरात सात पोलीस ठाणी होती. पुणे आयुक्तालय अंतर्गत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहर परिसरात पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, सांगवी, हिंजवडी, वाकड ही पोलीस ठाणी होती. चतुःशृंगी
पोलीस ठाण्याचे विभाजन करून २०१२ मध्ये सांगवी पोलीस ठाणे सुरू करण्यात आले, तर त्यापूर्वी चतुःश्रृंगी आणि पौड पोलीस ठाण्याचे विभाजन करून हिंजवडी पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले. हिंजवडी पोलीस ठाण्यासाठी २००२ पासून आतापर्यंत दोन स्वतंत्र इमारती मिळाल्या आहेत. मात्र, २०१२ मध्ये सुरू झालेल्या सांगवी पोलिसांची परवड अद्याप थांबलेली नाही. पोलीस ठाण्यातील अंमलदारांना भर उन्हात पत्र्याच्या शेडमध्ये बसावे लागत आहे.
गेल्या अकरा वर्षांत सांगवी पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियुक्त केले गेले. आयुक्तालय होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवडसाठी एक उपायुक्त आणि दोन सहायक पोलीस आयुक्त होते. या सर्व अधिकाऱ्यांचे वारंवार याच सांगवी पोलीस ठाण्यात जाणे-येणे होत असे. मात्र, अद्यापपर्यंत सांगवी पोलिसांना हक्काची जागा मिळू शकलेली नाही. दुसरीकडे भोसरी पोलीस ठाण्याचे विभाजन करून सुरू करण्यात आलेले भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे स्वतंत्र इमारतीत कामकाज करीत आहे. देहूरोड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन परंदवडी - शिरगांव प्रस्तावित पोलीस ठाण्यासाठी इमारत तयार आहे.
देहूरोडचे विभाजन होऊन रावेत पोलीस ठाणे सुरू होऊन तेही स्वतंत्र जागेत सुरू आहे. चाकणमधून विभाजित झालेल्या म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यासाठीही स्वतंत्र जागा सुरुवातीलाच मिळाली आहे. त्यामुळे आता सांगवी पोलिसांनाच जागा का मिळालेली नाही, हे कळत नाही. आतापर्यंतच्या चारही पोलीस आयुक्तांनी सांगवी पोलीस ठाण्याच्या जागेसाठी प्रयत्न केल्याचे सांगितले
जाते, पण स्वतंत्र हक्काची जागा सांगवी पोलिसांना अद्यापही मिळालेली नाही, हीच वस्तुस्थिती आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.