संगीत बारी... मित्र डोक्यात कुऱ्हाड मारी
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
संगीत बारीमध्ये पैसे देण्यावरून दोन मित्रांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी परिसरात नुकताच उघडकीस आला.
जखमी गिरीश विठ्ठल ढोमे (वय २६, सध्या रा. भोसरी, मूळ गाव शिरूर) याने या प्रकरणी फिर्याद दिली असून, आरोपी सौरभ गोरख बिबे (वय २२, सध्या रा. मोशी प्राधिकरण, मूळ गाव बीड) याला अटक करण्यात आली आहे.
ढोमे आणि बिबे हे मित्र आहेत. पैसे उधार देण्या-घेण्यावरून वाद झाल्याची फिर्याद ढोमे याने दिली आहे. ढोमे याने दिलेले पैसे परत मागण्यावरून वाद झाला. ‘‘पैसे देतो, काही वेळासाठी एका ठिकाणी जायचे आहे, असे सांगून बिबेने मला बाहेर नेले.
आम्ही माझ्या कारमध्ये गेल्यानंतर त्याने एका मित्राकडून दीड लाख रुपये घेऊन मला दिले. तेव्हा त्याच्याकडे एक बॅग होती. पैसे घेऊन निघताना मळमळ आणि चक्कर येत असल्याचे कारण देऊन बिबे हा पाठीमागील सीटवर जाऊन झोपला होता. तर मी पुढील सीटवर बसून स्टेअरिंगवर डोके ठेवून झोपलो होतो. दरम्यान, बिबे याने पाठीमागून माझ्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले.
जखमी अवस्थेत मी कारमधून खाली उतरलो. तेवढ्यात बिबे हा कार आणि ॲपल कंपनीचा मोबाईल घेऊन निघून गेला. बिबे याने येतानाच बॅगेत कुऱ्हाड आणली होती. तीच त्याने मला मारून पैसेदेखील घेऊन गेला,’’ अशा आशयाची फिर्याद ढोमे याने पोलिसांकडे दिली.
दवाखान्यात दाखल झाल्यानंतर ढोमे याच्याकडून पोलिसांना हा प्रकार कळविण्यात आला. पोलिसांनी बिबे याला अटक केली. तेव्हा त्याने दिलेली माहिती आणि दोघांच्या उलट चौकशीतून वेगळाच प्रकार समोर आला आहे. दोघेही पैशांची देवाणघेवाण आणि त्यावरून वाद असल्याचे सांगत असतानाच संगीत बारी लावण्यावरून वाद झाल्याचे आता पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
जामखेड येथील संगीत बारीमध्ये जाऊन तमाशा पाहण्याचे दोघांनी नियोजन केले होते. त्यानंतर तेथे पैसे कोणी द्यायचे यावरून वाद झाले. जामखेडपर्यंत जाऊन पैशांवरून वाद झाल्याने दोघे परतले होते. या प्रकारानंतर ढोमे याच्या कारमध्ये पूर्वीपासून असलेल्या कुऱ्हाडीने बिबे याने घाव घातले. तसेच संगीत बारी आणि तेथील उधळण उघड होऊ नये, म्हणून दोघेही वेगवेगळी कारण देत आहेत.
आळंदी-चाकण भागातून खून झाल्यानंतर त्याची धक्कादायक कारणे समोर येत आहेत. त्यातच आता संगीत बारीमध्ये पैसे कोणी द्यायचे यावरून मित्राने डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘‘दोघांच्या चौकशीतून वेगवेगळी कारणे
पुढे येत आहेत.
तपासात समोर आलेल्या बाबी तसेच पुढील तपासातून या घटनेमागील जामखेड कनेक्शन उघड होईल,’’ अशी माहिती या प्रकरणाचा तपास करीत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.