पानशेत प्रलयातला संगमेश्वर प्रकटला

काळाच्या ओघात मुळा-मुठेच्या पात्रात हरवलेल्या पुरातन वास्तू, शिल्पे, शिलालेख अधूनमधून डोकं वर काढतात. मात्र, वाढत्या नागरिकरणाबरोबर त्याकडे कोणाला लक्ष देण्यास वेळ नसल्याने ते तसे दुर्लक्षित राहतात. नदीपात्र सुधारणा कार्यक्रमाला होणाऱ्या तीव्र विरोधाने आता वेगळी दिशा घेतली असून मुळा-मुठेकाठच्या पुरातन वास्तूंचे संवर्धन करण्याची भूमिका जोर धरत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 4 Apr 2023
  • 12:45 am
पानशेत प्रलयातला संगमेश्वर प्रकटला

पानशेत प्रलयातला संगमेश्वर प्रकटला

नदीपात्र सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत काँिक्रट आिण ग्रॅनाईटखाली गडप होणारे पुरातन मंिदराचे अवशेष नागरिकांनी वाचवले.

अनुश्री भोवरे/ विजय चव्हाण

anushree.bhoware@punemirror.com

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@Anu_bhoware @VijayCmirror

काळाच्या ओघात मुळा-मुठेच्या पात्रात हरवलेल्या पुरातन वास्तू, शिल्पे, शिलालेख अधूनमधून डोकं वर काढतात. मात्र, वाढत्या नागरिकरणाबरोबर त्याकडे कोणाला लक्ष देण्यास वेळ नसल्याने ते तसे दुर्लक्षित राहतात. नदीपात्र सुधारणा कार्यक्रमाला होणाऱ्या तीव्र विरोधाने आता वेगळी दिशा घेतली असून मुळा-मुठेकाठच्या पुरातन वास्तूंचे संवर्धन करण्याची भूमिका जोर धरत आहे. खूप वर्षांपासून संगमावरील पुरातन संगमेश्वर महादेव मंदिर अस्तित्वाच्या खुणा दाखवत होते. नदीपात्र सुधारणा कार्यक्रमांतर्गत खोदकाम सुरू असताना एका दगडात कोरलेले शिवलिंग, संगमेश्वर महादेव मंदिराचे पुरातन अवशेष गोपुरासह (मंदिराचे भव्य प्रवेशद्वार) संगमवाडी भागातील नागरिकांना सोमवारी आढळून आले. सुशोभीकरणात सिमेंट, संगमरवराखाली अस्तित्व हरवणारे संगमेश्वर मंदिर प्रकट झाले ते नागरिकांच्या उत्खननाच्या आग्रही भूमिकेमुळे.

मुळा-मुठा संगमाकाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी इतिहास संशोधक आणि स्थानिक नागरिक समीर निकम यांनी नदीपात्र सुधारणा कार्यक्रमाच्या आणि अन्य अधिकाऱ्यांसमोर अधिक उत्खनन करण्याची आग्रही भूमिका घेतली. जबाबदार नागरिक म्हणून निकम आणि त्यांचे सहकारी अशाप्रकारच्या पुरातन वास्तूंच्या संवर्धनासाठी सतत प्रयत्न करत असतात. नदीकाठी अशा प्रकारच्या पुरातन वास्तू मिळण्याची ही दुसरी वेळ असून अशाचप्रकारे उत्खनन केले तर आणखी पुरातन वास्तू सापडण्याची शक्यता अधिक.  

इतिहास संशोधक समीर निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमेश्वर महादेव मंदिराचे अवशेष आणि शिवलिंग त्यांना सापडले आहे. हे अवशेष अहल्याबाई होळकर यांच्या काळातील असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ते नजरेआड गेले. नवे मिळालेले अवशेष आश्चर्यकारक असून शिवलिंग एका दगडात कोरलेले आहे. तसेच गोपुराचे मिळालेले अवशेष क्वचित आढळणारे आहेत. या मंदिराचा परिसर नदीकाठच्या एक एकर परिसरात पसरलेला असून त्यावरील मंदिर पाहण्यासारखे आहे. १९६१ ला पानशेत धरण फुटल्याने सारे शहर वाहून गेले. त्यावेळी हे मंदिरही वाहून गेले. त्यानंतर प्रशासनाच्या कोणत्याही विभागाला या पुरातन पण देखण्या मंदिराचे पुनरुज्जीवन करावे असे वाटले नाही, ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे सांगून निकम म्हणतात की, ऐतिहासिक संदर्भ असलेली अशी वास्तू सापडण्याची ही पहिली वेळ नाही. या अगोदर २०१५ मध्ये नदी पुनरुज्जीवनाचे काम सुरू होते तेव्हा विष्णू आणि हनुमानाची मूर्ती सापडली होती. त्याचे वजन थोडेथोडके नव्हे तर अडीच टन एवढे होते. हे पुरातन अवशेष सापडल्यावर तातडीने आम्ही पुरातत्त्व खाते आणि महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, संबंधितांनी या पुरातन मूर्तींच्या संवर्धनाकडे लक्ष दिले नाही. त्यांचा या ऐतिहासिक  ठेव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून आम्हीच नदीकाठी मंदिर बांधून तेथे मूर्तींची स्वतंत्रपणे प्रतिष्ठापना केली.   

काही दिवसांपूर्वी बंडगार्डनच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारे तीन शिलालेख आढळल्याचे सांगून निकम म्हणाले की, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द पाळण्याकडे कानाडोळा केल्याने हा ऐतिहासिक ठेवा नष्ट  झाला. याबाबत संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना अनेक वेळा लेखी पत्रे पाठवली, विनंत्या केल्या, मात्र, कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. 

अशाच दुर्लक्षामुळे काळाच्या ओघात शहराचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा नष्ट होत चालल्याची खंत व्यक्त करून संगमेश्वर महादेव मंदिराच्या इतिहासाबद्दल निकम म्हणतात की, संगमावरील या मंदिराची स्थापना पेशवे काळात झाली होती. अहल्याबाई होळकरांच्या काळात ते पुन्हा बांधले गेले. त्या काळात पुण्यानजीकच्या लोहगाव, आळंदी, धानोरी, चाकण, विश्रांतवाडी आणि अन्य भागातील नागरिक नावेने पुण्यात यावयाचे. त्यावेळी वाहतुकीची साधने नसल्याने त्यांना जलमार्गाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. काळाच्या ओघात पुणे बदलत गेले आणि आसपासच्या भागातील नागरिकांना पुण्यात येणे सोपे व्हावे यासाठी मुळा-मुठेवर पूल बांधले गेले. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ती झाली १९६१ च्या पानशेत धरण फुटण्याच्या घटनेवेळी. या वेळी शहराबरोबर नदीकाठच्या अनेक पुरातन वास्तू नामशेष झाल्या, वाहून गेल्या. संगमेश्वर महादेव मंदिरही या जलप्रकोपाच्या विरोधात टिकले नाही. येरवडा येथे राहणारे मनोज शिरसाट म्हणतात की, पानशेत फुटीत मंदिर वाहून गेले मात्र, त्याच्या पुनरुज्जीवनासाठी कोणीही पुढे आले नाही. नदी पुनरुज्जीवनावेळी हे पुरात मंदिर विखुरलेल्या अवशेषासह आपले अस्तित्व दाखवून देते. हा विषय मिररने पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे उप अभियंता सुरेंद्र करपे यांच्याकडे उपस्थित केला असता त्यांनी अशा उत्खननाची आपल्याला कल्पना नसल्याचे सांगितले. मात्र, संगमावरील मंदिराच्या स्थितीकडे लक्ष वेधणारे निकम यांचे पत्र त्यांना मिळाले होते. त्यात निकम यांनी चर्चेप्रमाणे आम्ही हे काम सुरू करणार असल्याचे म्हटले होते. या पत्रात निकम यांनी नदीपात्र सुधारणा कामाबरोबर या पुरातन मंदिराची पुनर्स्थापना करण्याची मागणी केली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार नदी विकास प्रकल्प आणि पालिकेचा सांस्कृतिक वारसा विभाग मंदिर स्थळाला भेट देणार आहे. संगमेश्वर महादेव मंदिरासह नदीकाठी सापडलेल्या पुरातन वास्तूच्या आणि अवशेषांच्या पुनर्स्थापनेच्या प्रश्नांकडे लक्ष देणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story