‘स्मार्ट’ धूळधाण!
राजानंद मोरे
rajanand.more@civicmirror.in
TWEET@Rajanandmirror
आयटी’ची राजधानी, ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी कौतुकमिश्रित बिरुदे आणि विशेषणे मिरविणाऱ्या पुण्यात बाणेर-बालेवाडी आणि औंध भागात शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीला टांगली असल्याचे अनेकदा निष्पन्न झाले आहे . ‘पुणे तेथे काय उणे’ असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या या ‘स्मार्ट सिटी’चा एवढा ‘पाण’उतारा आधी कधीच झाला नाही. आता त्यात नव्या प्रकारची पण संतापजनक भर पडली आहे.
स्मार्ट सिटी ' प्रकल्पाचा भाग असलेल्या आणि तब्बल १६०० पटसंख्या असलेल्या महापालिकेच्या शाळेत स्मार्ट सिटी अंतर्गत दिलेले शिपाई पगाराअभावी निघून गेल्यानंतर शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यांना झाडलोट करावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. सध्या एकच शिपाई आणि तीन मजली शाळा असल्याने संपूर्ण शाळा झाडणे त्याच्या आवाक्याबाहेर गेले होते.
तीन मजली शाळेसाठी पालिकेने सध्या केवळ एकाच शिपायाची नेमणूक केली आहे. तो शिपाईदेखील रोजंदारी तत्त्वावर काम करत असल्याने केवळ सकाळच्या सत्रातच कामावर असतो. त्याच्याच कार्यालयीन कामांसह संपूर्ण शाळेची स्वच्छता व इतर कामेही तो करतो. दुपारच्या सत्रात मात्र शाळेत एकही शिपाई नसल्याने विद्यार्थी व शिक्षकांनाच स्वच्छता राखावी लागत आहे. विविध वर्गातील विद्यार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने ही कामे करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बालेवाडीमध्ये महापालिकेची कै. बाबुराव (शेठजी) गेणजी बालवडकर प्राथमिक विद्यामंदिर ही शाळा आहे. २०११ मध्ये या शाळेची नवी इमारत बांधण्यात आली. त्या वेळी शाळेमध्ये जवळपास ४०० विद्यार्थीसंख्या होती, पण शाळेतील शिक्षणाचा दर्जा आणि सुविधांमुळे वर्ग व विद्यार्थीसंख्या वाढत जाऊन सध्या जवळपास १,६०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. शाळेत बालवाडीपासून आठवीपर्यंतच वर्ग आहेत. तीन मजली इमारतीत १७ खोल्या असून, त्यातील एक खोली मुख्याध्यापक व एक खोली शिक्षकांसाठी आहे, तर एका खोलीत शाळेसाठी लागणारे सर्व आवश्यक साहित्य ठेवले जाते. त्यामुळे प्रत्यक्षात १३ खोल्याच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उपलब्ध होतात. परिणामी, दोन सत्रांमध्ये शाळा भरवली जाते.
गेल्या काही वर्षांत शाळेमधील विद्यार्थीसंख्या चांगल्याप्रकारे वाढली आहे. बालेवाडी परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचा ओढा या शाळेकडे असला, तरी महापालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. शाळेमध्ये २०१९ ला 'स्मार्ट सिटी प्रकल्पा'अंतर्गत दोन कर्मचारी साफ-सफाई व इतर कामांसाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्याकडून झाडलोट व इतर कामे केली जात होती, पण हा प्रकल्प मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात गुंडाळण्यात आला. त्यामुळे त्या दोन कर्मचाऱ्यांचे कामही बंद झाले. त्यानंतर महापालिकेने रोजंदारीवरील एका शिपायाची नियुक्ती केली आहे. हा शिपाई पहिल्या सत्रात येतो. त्याच्या एकट्यावरच संपूर्ण तीन मजली शाळा, मैदानाची झाडलोट, शाळेतील कार्यालयीन कामांसह इतर कामांचा बोजा असतो. दुपारच्या सत्रात एकही शिपाई नसल्याने शाळेतील झाडणकामाला विद्यार्थ्यांना जुंपण्याशिवाय पर्याय नसतो. प्रसंगी शाळेतील शिक्षकांनादेखील ही कामे करावी लागतात.
नाव न छापण्याच्या अटीवर एका शिक्षकाने सांगितले की, ‘शाळेला एकच शिपाई असल्याने अनेक अडचणी येतात. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना काम करण्याशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांना दररोज झाडलोटची कामे सांगितली जात नाहीत. तसेच केवळ व्हरांडा स्वच्छ केला जातो. वर्गखोल्या शिपाईच झाडून घेतो. विद्यार्थ्यांना काम सांगण्याचा आमचा कोणताही उद्देश नसतो. नाईलाजास्तव आम्हीही ही कामे करतो. त्यामुळे पालिकेने किमान आणखी एका शिपायाची नियुक्ती करणे गरजेचे आहे.’
सुविधांची अपूर्णता
शाळेमध्ये शिपाई नसणे एवढी एकच अडचण नसून, विद्यार्थ्यांना बसण्यासाठीही पुरेशा वर्गखोल्या नाहीत. एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी बसवावे लागतात. एका बाकावर तीन-तीन विद्यार्थी बसतात. सामान ठेवण्याच्या खोलीत एका वर्गातील विद्यार्थ्यांचे शिक्षण चालते. बालवाडीचा छोटा व मोठा गटही एकाच खोलीत बसतो. दोन सत्रांत शाळा असूनही जागा पुरत नाही. शाळेत मुलांच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्याही कमी आहे. मैदान अपुरे पडते. एकाचवेळी सर्व विद्यार्थी प्रार्थनेसाठीदेखील एकत्र येऊ शकत नसल्याची स्थिती आहे.
उपोषण करण्याचा 'स्वाभिमानी'चा इशारा
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महापालिका आयुक्तांसह शिक्षण विभागाकडे अतिरिक्त कर्मचारी देण्याची मागणी केली आहे. संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व बालेवाडीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश बालवडकर म्हणाले, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असूनही पालिकेकडून शाळेकडे दुर्लक्ष केले जात आहे. आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. १६०० विद्यार्थ्यांसाठी एकच शिपाई आहे. एका-एका अधिकाऱ्याच्या दिमतीला चार-पाच शिपाई पालिकेत दिसतात. मग एवढ्या विद्यार्थ्यांसाठी एकच शिपाई देत, पालिकेकडून काय संदेश दिला जात आहे. स्वच्छतागृह, पाणी, मैदान, अपुऱ्या वर्गखोल्या अशा अनेक समस्या आहेत. याबाबत संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जात आहे. आता येत्या सोमवारी पालिकेला आणखी एक पत्र आम्ही देणार असून, त्यानंतर परिस्थिती सुधारली नाही, तर शाळेच्या आवारातच उपोषण करू,' असा इशाराही बालवडकर यांनी दिला. दरम्यान, याविषयी महापालिकेच्या शिक्षणप्रमुख मीनाक्षी राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.