'सिटी'त केवळ खड्डेच 'स्मार्ट'!

एकीकडे खड्डेमय रस्ते आणि दुसरीकडे 'स्मार्ट सिटी'च्या घोषणा या दुटप्पीपणाला कंटाळलेल्या औंध भागातील रहिवाशांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'सीविक मिरर'च्या वतीने 'सिटीझन फोरम फॉर पॉटहोल्स/रोड सोल्युशन्स' (सीएफपीआरएस) मंचाच्या स्थानिक बैठकीचे आयोजन औंध भागात नुकतेच करण्यात आले. यावेळी 'पुणे स्मार्ट सिटी कमिशन'च्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना पूर्णतः फसल्या असून, त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशा शब्दांत नागरिकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Editor User
  • Tue, 17 Jan 2023
  • 03:14 pm
'सीविक मिरर'च्या वतीने 'सिटीझन फोरम फॉर पॉटहोल्स/रोड सोल्युशन्स' (सीएफपीआरएस) मंचाच्या स्थानिक बैठकीचे आयोजन औंध भागात झाले

'सीविक मिरर'च्या वतीने 'सिटीझन फोरम फॉर पॉटहोल्स/रोड सोल्युशन्स' (सीएफपीआरएस) मंचाच्या स्थानिक बैठकीचे आयोजन औंध भागात झाले

स्मार्ट सिटी मोहिमेतील पहिले मॉडेल ठरलेल्या औंधची अवस्था; सुधारणेसाठी नागरिक एकवटले

विकी पठारे

feedback@civicmirror.in

TWEET@Vicky9_Mirror

एकीकडे खड्डेमय रस्ते आणि दुसरीकडे 'स्मार्ट सिटी'च्या घोषणा या दुटप्पीपणाला कंटाळलेल्या औंध भागातील रहिवाशांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'सीविक मिरर'च्या वतीने 'सिटीझन फोरम फॉर पॉटहोल्स/रोड सोल्युशन्स' (सीएफपीआरएस) मंचाच्या स्थानिक बैठकीचे आयोजन औंध भागात नुकतेच करण्यात आले. यावेळी 'पुणे स्मार्ट सिटी कमिशन'च्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना पूर्णतः फसल्या असून, त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशा शब्दांत नागरिकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

'सिटीझन फोरम फॉर पॉटहोल्स /रोड सोल्यूशन्स' मंचाच्या औंधमधील स्थानिक बैठकीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

'पुणे स्मार्ट सिटी कमिशन'च्या अंतर्गत तयार करण्यात आलेले 'मॉडेल' प्रत्यक्षात मात्र कुचकामी ठरताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरील वाढणारी खड्ड्यांची संख्या, वाहतूक कोंडी, पदपथावरील अतिक्रमण, बेकायदा बांधकामे अशा नानाविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या बैठकीला औंध भागातील सजग नागरिक, अभ्यासक, कार्यकर्ते अशा विविध घटकांतील नागरिक उपस्थित होते. पुणे महापालिकेचा कारभार, कायदेशीर बाबी याबाबतही या वेळी चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटीमध्ये नागरिकांना सुविधा देतानाच त्यांना सुखी व शांत जीवन मिळावे, याचाही विचार असावा, यावर बैठकीत भर देण्यात आला.

चर्चेदरम्यान काही प्रश्न ठळकपणे मांडण्यात आले. 'आयटीआय'च्या जवळील रस्ता दुभाजक चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याने तेथे सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. यावर 'सीएफपीआरएस'चे सदस्य व रोटरियन नितीन जोशी म्हणाले, ''गेल्या काही दिवसांत मी त्या भागात किमान १० अपघात घडलेले पाहिले आहेत. त्या भागात न राहणाऱ्या किंवा तेथून ये-जा न करणाऱ्या लोकांना याची तीव्रता कळू शकणार नाही. मी स्वतः काही अपघातग्रस्तांना मदत केली आहे.''

डीपी रस्ता, आयटीआय रस्ता, मेडीपॉइंट रस्ता यांसारख्या ठिकाणी वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना औंधवासीयांना करावा लागत आहे. येथील पदपथांवरून चालणे नागरिकांसाठी अधिकच कष्टप्रद होत असून, अतिक्रमणाचा विळखा वाढताना दिसत आहे. औंध विकास मंडळाच्या चित्रा सुब्रह्मण्यम यांनी याच मुद्द्यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ''पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली नाहीत, तर नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागेल आणि यामुळे अडचणी वाढतील.''

औंधमधील रहिवासी  सचिन बेंदारे यांनी शाळांजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे उपस्थितांचं लक्ष वेधले. ते म्हणाले, ''डीएव्ही पब्लिक स्कूलजवळ नेहमीच वाहतूक कोंडी होते. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे अपघातांचा धोकाही वाढतो. तेथे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलीस किंवा वॉर्डनची नेमणूक होणे गरजेचे आहे.''

रूपेश जुनवणे म्हणाले, ''मेट्रोचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यातच पावसाचे पाणी वाहून जावे, यासाठी कोणत्याही पद्धतीचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले नाही. त्यामुळे बाणेर फाटा ते चतुःश्रृंगी चौक या पट्ट्यात पावसाच्या काळात पाणी तुंबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडू शकतात. या भागात ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी व पावसाचे पाणी साठण्याचे प्रकार लक्षात घेता, तेथे वाहतूक वॉर्डनची नेमणूक करणे गरजेचे आहे.''

औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण भागातील नागरिकांच्या गटाशी संबंधित असलेल्या वैशाली पाटकर म्हणाल्या, ''नागरिकांनी अधिकाधिक सजग होणे गरजेचे आहे. त्यांनी वेळोवेळी आपल्या लेखी तक्रारी महापालिकेकडे द्यायला हव्यात. त्याचबरोबर अतिक्रमण विभाग, एमएसईडीसीएलचे अधिकारी यांच्यासोबतही वेळोवेळी बैठक घेऊन आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हव्यात.''

नागरिकांच्या या सर्व समस्या संबंधित प्रभाग अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आणि महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार मंचाने केला आहे. मंचाने शहरातील ५७ रस्त्यांची पाहणी केली असून, येत्या पावसाळ्याच्या आधीच तेथील खड्डे बुजवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. यावर महापालिका प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे. 'सीएफपीआरएस'ची पुढील बैठक फेब्रुवारी महिन्यात विश्रांतवाडी भागात होणार आहे. त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.  

 

मंचाच्या बैठकीत अधोरेखित झालेल्या महत्त्वाच्या समस्या

आयटीआय रस्त्यावरील दुभाजकामुळे रस्ते अपघाताला निमंत्रण मिळतेय.

डीएव्ही स्कूल आणि डीपी रस्ता येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे.

पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढणे.  

औंध भागातील मुख्य रस्त्यांच्या पदपथावरील अतिक्रमणे हटवण्याची गरज आहे.

मोक्याच्या ठिकाणी त्या त्या भागातील स्थानिक नेते, पदाधिकारी यांचे नाव, संपर्क क्रमांक इत्यादींची माहिती देणारे फलक उभारण्याची गरज आहे.

अतिक्रमणमुक्त पदपथ करून नागरिकांना 'राइट टू वॉक' मिळवून देण्याची गरज.

 

औंधमध्ये रस्त्यांची प्रलंबित कामे, कोंडी अन् अतिक्रमण    

'सीविक मिरर'च्या 'सिटीझन फोरम फॉर पॉटहोल्स /रोड सोल्युशन्स' मंचाच्या पहिल्या स्थानिक बैठकीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बैठकीत शहराच्या विविध भागातील नागरिकांनी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन सहभाग नोंदवला. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींनी या बैठकीत हजेरी लावून त्यांच्या भागातील रस्त्यांची अवस्था मांडली. औंधमधील रहिवाशांनी रस्त्यांची अवस्था, रचना, रुंदी यावर भाष्य केले. पदपथांवरील अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असून, यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या कामामुळे रस्त्याचे कामही रखडल्याकडे नागरिकांनी बोट दाखवले. कचरा, काही ठिकाणी अवैध बांधकामामुळे अरुंद झालेले रस्ते आणि मॉलमुळे रस्त्यांची कमी झालेली रुंदी आदी मुद्देही नागरिकांनी उपस्थित केले. विकास आराखड्याशी सुसंगत या बाबी नसल्याचेही त्यांनी नमूद केले. 

 

पदपथांवरील अतिक्रमणे लवकरात लवकर हटवायला हवीत. पदपथ मोकळे नसल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावर चालावे लागते.

- चित्रा सुब्रह्मण्यम, औंध विकास मंडळ

 

पावसाचे पाणी वाहून जावे यासाठी कोणत्याही पद्धतीचे नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे बाणेर फाटा ते चतुःश्रृंगी चौक या पट्ट्यात पावसाच्या काळात पाणी तुंबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडू शकतात.

- रूपेश जुनवणे, रहिवासी, औंध

 

डीएव्ही पब्लिक स्कूलजवळ नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अपघातांचा धोकाही वाढतो. तेथे वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलीस किंवा वॉर्डनची नेमणूक होणे गरजेचे आहे.

- सचिन बेंदारे, रहिवासी, औंध

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story