सिकंदर विरुद्ध महेंद्र महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
सीविक मिरर ब्यूरो
feedback@civicmirror.in
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
राज्याच्या कुस्ती क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच कोथरूड परिसरात पार पडली. या स्पर्धेत मारुती सातव यांनी पंच म्हणून काम पाहिले. सातव यांच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने संपर्क साधला. मल्ल सिकंदर शेखविरुद्ध झालेल्या लढतीत प्रतिस्पर्धी मल्ल महेंद्र गायकवाडला चुकीच्या पद्धतीने चार गुण बहाल केल्याचा आरोप अज्ञाताने केला. तसेच त्याने सातव यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष संदीप भोडवे यांनी मुंबईतील एका पोलिस कॉन्स्टेबल विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे.
या स्पर्धेच्या माती विभागातील उपांत्य सामना सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. सामन्यांत वरचढ दिसणाऱ्या सिकंदर शेख याच्या विरोधात महेंद्र गायकवाडने दुसऱ्या फेरीत ४ गुण मिळवत ५-४ अशी आघाडी घेतली. त्यामुळे या चुरशीच्या लढतीत सिकंदरला अवघ्या एका गुणाने पराभव पत्करावा लागला. सिकंदर आघाडीवर असताना पंचांनी निर्णायक क्षणी महेंद्रला चार गुण देण्याचा निर्णय विवादास्पद ठरला. त्याच निर्णयाचा रोष मनात ठेवून ही धमकी देण्यात आली. या प्रकरणात सातव यांचा जबाब नोंदवून घेण्यात येणार असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.
सिकंदरला न्याय दिला गेला नाही, असे आक्षेप मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर नोंदवले गेले आहेत. महेंद्रने सिकंदरला बाहेरील टांग हा डाव टाकला. तो परफेक्ट नव्हता, असं काहींचं म्हणणं असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. सिकंदर धोकादायक पोजिशनला नव्हता तरी महेंद्रला चार गुण कसे दिले गेले, असा प्रश्न विचारला जातोय. सिकंदरच्या आई-वडिलांनीही आपल्या लेकराला न्याय दिला नसल्याची खंत बोलून दाखवली आहे.