लाल महालावर प्रथमच फडकणार भगवा

ऐतिहासिक लाल महालावर शिवजयंतीदिनी महापालिकेकडून भगवा ध्वज (जरीपटका) फडकावला जाणार आहे. त्यासाठी पालिकेकडून महालावर पहिल्यांदाच ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Feb 2023
  • 12:28 pm
लाल महालावर प्रथमच फडकणार भगवा

लाल महालावर प्रथमच फडकणार भगवा

शिवजयंतीदिनी महापालिकेकडून प्रथमच उपक्रम, ध्वजस्तंभही उभारला, निर्णयाचे सर्व घटकांकडून स्वागत

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

ऐतिहासिक लाल महालावर शिवजयंतीदिनी महापालिकेकडून भगवा ध्वज (जरीपटका) फडकावला जाणार आहे. त्यासाठी पालिकेकडून महालावर पहिल्यांदाच ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.

पालिकेकडून पहिल्यांदाच महालात भगवा ध्वज फडकावला जात असल्याचा दावा शिवप्रेमींकडून करण्यात आला आहे. महालापासून अगदी दुरूनदेखील हा ध्वज सहज नजरेस पडेल, अशी उंचीवर तो फडकविण्यात येणार आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे सर्व घटकांकडून स्वागत केले जात आहे.

शहाजीराजे भोसले यांनी बांधलेल्या लाल महालाला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे महालात बराच काळ वास्तव्य होते. शिवाजी महाराजांचे बालपण याच महालात गेले. याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानची बोटे कापली होती. सध्या अस्तित्वात असलेली लाल महाल ही वास्तू पालिकेने १९८८ साली उभारली. शिवकाळातील लाल महाल आता अस्तित्वात नाही. पालिकेकडून या महालाचे संवर्धन केले जात आहे. सुमारे पाच वर्ष सुरू असलेले पुनर्विकासाचे काम मागील वर्षीच पूर्ण करून हा महाल नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.

संवर्धनाच्या कामाअंतर्गत महालावर १५ ते २० फुटी उंच ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी भगवा ध्वज फडकावला जाणार आहे. यादिवशी लाल महालात हजारो शिवप्रेमी येत असतात. त्यांच्या साक्षीने भगवा ध्वज फडकविला जाईल. काही वर्षांपासून सामाजिक संस्थांकडून महालावर भगवा फडकावला जात होता. आता पहिल्यांदाच या संस्थांच्या मागणीनंतर पालिकेकडून पुढाकार घेण्यात आला.

रक्तहितवर्धिनी सामाजिक संस्थेकडून भगवा ध्वज फडकविण्याबाबत मागणी कऱण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर शिंदे म्हणाले, ‘‘काही वर्षांपूर्वीपासून आम्ही आणि शिवप्रेमी संघटनांकडून महालावर भगवा ध्वज फडकावत होतो. महालाच्या पुनर्विकासाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्याअंतर्गतच महालावर पालिकेकडून कायमस्वरुपी ध्वज स्तंभ उभारून भगवा फडकावण्याची मागणी भवन रचना विभागाकडे केली होती. त्यानुसार त्यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून त्याचा आम्हाला आनंदच आहे. पालिकेकडून पहिल्यांदाच अधिकृतपणे भगवा फडकावला जाणार आहे.’’

याविषयी बोलताना पालिकेच्या भवन रचना विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील मोहिते यांनी सांगितले की, ‘‘महालावर ध्वज स्तंभ उभारण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार स्तंभ उभारण्यात आला असून शिवजयंतीदिनी ध्वज फडकावला जाईल. काही संघटनांकडून याआधीपासून ध्वज फडकावण्यात येत आहे. यासह महालामध्ये भविष्यातही संवर्धनाचे विविध प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. शनिवारवाड्याच्या बाजूकडे सीमाभिंतीला मोठा दरवाजा उभारला जाणार आहे. गड-किल्ल्यांना असलेल्या दरवाजांप्रमाणे या दरवाजाची रचना असेल.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story