‘सुरक्षित’ कोरेगाव पार्क चंदनचोरांच्या िनशाण्यावर
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
सुरक्षा रक्षकांच्या गळ्याला चाकू लावत सात ते आठजणांच्या टोळक्याने एका सोसायटीच्या आवारातील चंदनाची झाडे चोरून नेली होती. या घटनेला चार दिवस उलटत नाही तोच चोरट्यांनी पुन्हा त्याच सोसायटीच्या आवारात घुसून चंदनाची अन्य दोन झाडे तोडून नेल्याचा प्रकार कोरेगाव पार्कमधील क्लोअर डेल या सोसायटीत घडला आहे. विशेष म्हणजे गळ्याला चाकू लावत चोरी केली असताना पोलिसांनी मात्र केवळ चंदनचोरीचा गुन्हा दाखल केल्याची खंत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कोरेगांव पार्कमधील लेन क्रमांक ७ मधील क्लोअर डेल सोसायटीचे व्यवस्थापक शहानवाज नुरनबी शहा (वय ४७) यांनी या प्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हा दाखल झाल्यानंतरही चोरट्यांनी त्याच सोसायटीत घुसून झाडे कापून नेण्याचे धाडस केले आहे.
या सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या जगदीश बांगर आणि वासू व्यंकट दोदला या दोघांच्या गळ्याला चाकू लावून सात ते आठजणांचे टोळके सोसायटीच्या आवारात घुसले. या सर्व प्रकाराचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. झाडे तोडून नेल्यावर घाबरलेल्या सुरक्षा रक्षकांनी सोसायटीचे व्यवस्थापक शहा, अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांकडे गेल्यावर मात्र, लूटमारीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होण्याऐवजी चोरीची फिर्याद घेण्यात आली. आम्ही सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतरही आमचे म्हणणे न ऐकून घेता चोरीची फिर्याद घेतली गेली, असा आरोप या सोसायटीचे पदाधिकारी ॲड. हिमांशू मारटकर यांनी 'सीविक मिरर’ शी बोलताना केला आहे.
चंदनचोरीच्या घटनांचा आढावा घेतला असता, पुणे शहर परिसरात या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरी ‘पुष्पा’ला पकडण्यात पोलिसांना यश का येत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मध्यंतरी शहर पोलिसांनी चंदन तस्करी प्रकरणात काहीजणांना अटक केली. मात्र, त्यानंतरही शहरातील शासकीय, निमशासकीय आणि उच्चभ्रू लोकवस्तीतील चंदनाची झाडे कापून चोरून नेण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.
एखाद्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने या चोरांना विरोध केल्यास थेट चाकू गळ्याला लावून आवारात प्रवेश केल्याचे या घटनेवरून समोर आले आहे. त्यामुळे चंदनासाठी नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगांव पार्कसारख्या परिसरात अशा घटना घडणे धक्कादायक आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करून सर्वसामान्यांच्या सुरक्षेची खात्री देण्याची गरज आहे. पाच-सात माणसे हत्यारांसह गृहसंकुलात घुसून झाडे तोडून नेल्यावरही त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याऐवजी चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे दुसऱ्यांदा त्याच गृहसंकुलात घुसण्याची हिंमत या लोकांची झाली. आज चाकूच्या धाकाने चंदन चोरून नेले. उद्या हे लोक घरात घुसले तर काय करणार? असा सवाल क्लोअर डेल सोसायटीचे पदाधिकारी ॲड. हिमांशू मारटकरांनी उपस्थित केला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.