सभा काटेंच्या प्रचाराची, भाषणे शिवसेनेच्या उभारीची!
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी सोमवारी आयोजित केलेल्या सभेत अशी भाषणे झाली की, सभा नेमकी कोणासाठी होती, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडावा. सभेत काटेंच्या प्रचाराऐवजी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना लक्ष्य करण्याच्या नादात शिवसेनेला उभारी देण्याची भाषा बोलली गेली. "शिवसेनेला कशी उभारी द्यायची", "शिवसेनेला सोडून गेलेल्यांना धडा शिकवायचा", "मुख्यमंत्र्यांच्या सभेला खुर्च्यांची गर्दी" अशा पद्धतीने तीन नेत्यांनी फटकेबाजी केली.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन केले होते. परंतु, हा मेळावा नेमका कशासाठी होता असा प्रश्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची बंडखोरी मोडून काढण्यात अपयश आल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणातून जाणवत होते. २०१९ च्या निवडणुकीची आठवण करून देत कलाटे यांचा नामोल्लेख टाळत पवार म्हणाले की, मागील चिंचवड विधानसभा निवडणुकीत अपक्षाला लाखांच्यावर मते पडली. ही मते तुझी आहेत का? अरे बेट्या, मी राष्ट्रवादीचा उमेदवार उभा केला नाही, म्हणून ही मते मिळाली. बेडूक फुगल्यानंतर त्याला वाटतं मीच फुगतोय. पण तसे नसतं. बंडखोराचा बोलविता धनी कोण आहे, असा प्रश्नही करत अजित पवार यांनी संभ्रमाचे वातावरण तयार केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘काहीजण उमेदवारी मागत होते, मी सर्व नेत्यांशी बोलून राष्ट्रवादीची उमेदवारी ठरविली. बंडखोरी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. लढत भाजप आणि राष्ट्रवादीतच होणार आहे. त्यामुळे कोणीही रुसू नका? फुगू नका, नाराज होऊ नका. गद्दारांनी गालबोट लावले असल्याने त्यांना धडा शिकविणे गरजेचे आहे.’’
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड करून महाविकास आघाडी सरकार पाडले. उद्धवसाहेबांना त्यांच्यामुळे मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. आपल्या सगळ्यांची आता सटकली पाहिजे. त्याचा बदला या निवडणुकीत शिवसैनिकांनी घ्यायचा आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मूठ बांधा. कारण मूठ बांधली की धनुष्यबाण येतो, घडी येते, पंजा येतो. काही झाले तरी आपल्याला धनुष्यबाण परत आणायचा आहे. आदित्य साहेब धनुष्यबाण परत आणण्यासाठी आपण प्लॅन करू. आता सगळा खेळ हातावर आहे.
युवा सेनाप्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, राज्यातील घटनाबाह्य सरकार पडणार म्हणजे पडणार आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला फक्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते. कारण, त्यांनी खुर्चीसाठी गद्दारी केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.