धावत्या शवपेत्या

शनिवारी बुलढाण्याजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक तज्ज्ञांनी सर्व स्लीपर कोच बसेसवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या माॅडीफाय केलेल्या बस म्हणजे 'फिरत्या शवपेट्या आहेत , असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. विदर्भ बस सर्विसच्या स्लीपर बसमध्ये शनिवारी २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Mon, 3 Jul 2023
  • 09:02 am
धावत्या शवपेत्या

धावत्या शवपेत्या

बसमध्ये नियमबाह्य बदल करून रस्त्यावर धावणाऱ्या 'स्लीपर कोच'ना नाहीत आपत्कालीन दरवाजे, एका बाजूला उलटल्यास सुटका अशक्य

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@VijayCmirror

शनिवारी बुलढाण्याजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक तज्ज्ञांनी सर्व स्लीपर कोच  बसेसवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या माॅडीफाय केलेल्या बस म्हणजे  'फिरत्या शवपेट्या आहेत , असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. विदर्भ बस सर्विसच्या स्लीपर बसमध्ये शनिवारी २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अनेकांना त्यांना बाहेरच येता आले नाही. त्यामुळे १० मिनिटांच्या आक्रोशानंतर वेदनादायी मृत्यूला सामोरे जावे लागले. 

 राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नवे डिझाईन तयार करणारे रवी मेहेंदळे यांच्या मते, "स्लीपर बसमध्ये प्रवाशांना झोपण्यासाठी जागा केल्याने हालचालीसाठी कमी जागा देतात. या बसेस साधारणत: ८-९  फूट उंच असतात.  

त्यामुळे, जर बस अचानक एका बाजूला कलंडली तर  प्रवाशांना आपत्कालीन दरवाजापर्यंत पोहोचता येत नाही आणि अशा परिस्थितीत बाहेर पडणे अशक्य होते.

 मेहेंदळे पुढे म्हणाले की, त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून स्लीपर बसच्या उत्पादनावर बंदी घालण्याची विनंती केली होती, परंतु त्यावर अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

सेव्ह पुणेचे डॉ. हर्षद अभ्यंकर म्हणाले, "पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आरटीओने  बसच्या अवस्थेच्या तपासणीसाठी मोहीम सुरू करणे अपेक्षित आहे. अशा बेकायदा माॅडीफाय बसवर बंदी घातली पाहिजे.  महामार्गावरील वेग मर्यादा नियंत्रित ठेवण्याची गरज आहे. समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादा ताशी १२० किमी आहे. सरकारने तत्काळ वेग मर्यादा कमी करावी," असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्र मोटार ट्रान्सपोर्ट चालक मालक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा शिंदे म्हणाले, "सरकारने अपघातांमागील कारणांची योग्य उत्तरे शोधून काढली पाहिजेत. सर्व संभाव्य डार्क स्पॉट्स ओळखणे आणि  समस्येवर उपाय शोधणे आवश्यक आहे."

डॉ. मनोज सहाणे यांच्या मते, " स्लीपर कोच बसमध्ये एका बाजूला डबल बर्थ आणि एका बाजूला सिंगल बर्थ असतो. डबल बर्थची रुंदी साडेचार फूट, तर सिंगल बर्थची उंची अडीच फूट असते. त्यामुळे बस एका बाजूला उलटल्यास प्रवाशांना सहा फूट किंवा अडीच फुटांपर्यंत उडी मारावी लागेल. ज्येष्ठ नागरिकांना अशा उड्या मारणे शक्य नाही. तरुणांनाही सहा फुटांपर्यंत उडी मारणे अवघडच आहे. त्यामुळे स्लीपर कोच बस प्रवाशांच्या सुरक्षिततेला बाधकच आहेत."

प्रादेशिक परिवहन विभागाचे एक अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले, " जगात कोठेही अशा पद्धतीने बसबांधणी केली जात नाही. त्यामुळे प्रवासी बस आसनांच्याच हव्यात. परंतु अधिक उत्पन्नाच्या लालसेने असे बदल केले जातात.  

"स्लीपर बसमध्ये ' शयनासाठी आसनाची व्यवस्था करताना आपत्कालीन दरवाजा बंद ठेवला जातो किंवा असला तरी 'कंपार्टमेंट'मुळे तो झाकला जातो. बसचा चालक किंवा मदतनिसाकडून (क्लीनर) प्रवाशांना या आपत्कालीन दरवाजाची माहिती दिली जात नाही." असेही आमच्या पाहणीत दिसले आहे. आम्ही लवकरच यावर विशेष मोहीम राबवणार आहोत," असेही ते म्हणाले. 

राज्यात वारंवार रस्ते अपघात होत आहेत. राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, घाटरस्ता येथे वेगवेगळ्या भागांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागपूर आणि मुंबई या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग 

नागरिकांसाठी वापरास खुला झाल्यापासून त्यावर सातत्याने अपघातसत्र सुरू आहे. आतापर्यंत या महामार्गावर ३०० च्या आसपास प्रवाशांचा अपघाती  मृत्यू झाला आहे. या महामार्गावर सरासरी रोज एक अपघात होत आहे. महामार्गावर कधी प्राणी आडवे येऊन, कधी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे, कधी चालकाला डुलकी लागल्यामुळे, वाहनाचे टायर फुटल्यामुळे अपघात होत आहेत. समृद्धी महामार्गाावर पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी हा मार्ग सुरू झाला, तेव्हापासूनच या मार्गावर अपघात होत आहेत. वन्यप्राण्यांसाठी अंडरपास, ओव्हरपास तयार होण्यापूर्वीच महामार्ग सार्वजनिक वापरासाठी उद्घाटन करून खुला करून देण्यात आला होता. अद्याप महामार्गावर सीसीटीव्ही बसविण्याचे, वेग नियंत्रकासाठी अन्य तांत्रिक साधने बसविण्याचे काम झालेले नाही. तरीही या महामार्गाच्या उद्घाटनाचे काम घाईघाईने का करण्यात आले, असा सवाल आज पुन्हा उपस्थित केला जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story