आरटीओत लागतात टेपा

वाहतूक नियमानुसार १५ वर्षांपुढील वाहनांना प्रादेशिक कार्यालयामध्ये पुनर्नोंदणी करणे आवश्यक असते. पर्यावरण कर तसेच इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना पाच वर्षांसाठी नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. यावेळी सुरक्षेसाठी व्यावसायिक वाहनांना विशिष्ट रंगाचे रेडियम टेप लावणे बंधनकारक आहे. त्यानंतरच फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. त्याचा गैरफायदा घेत पुणे आरटीओच्या फुलेनगर येथील कार्यालयात खासगी वाहनांच्या मालकांना न विचारता गाड्यांवर रेडियम लावून अधिकचे पैसे उकळले जात असल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 30 Mar 2023
  • 10:46 am

आरटीओत लागतात टेपा

फुलेनगर कार्यालयात १५ वर्षांपुढील वाहनांची पुनर्नोंदणी करताना विशिष्ट रंगाच्या रेडियमच्या नावाखाली सुरू आहे वाहनमालकांची लूट

तन्मय ठोंबरे / राजानंद मोरे

tanmay.thombre@civicmirror.in/rajanand.more@civicmirror.in

TWEET@tanmaytmirror/@Rajanandmirror

वाहतूक नियमानुसार १५ वर्षांपुढील वाहनांना प्रादेशिक कार्यालयामध्ये पुनर्नोंदणी करणे आवश्यक असते. पर्यावरण कर तसेच इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना पाच वर्षांसाठी नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. यावेळी सुरक्षेसाठी व्यावसायिक वाहनांना विशिष्ट रंगाचे रेडियम टेप लावणे बंधनकारक आहे. त्यानंतरच फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. त्याचा गैरफायदा घेत पुणे आरटीओच्या फुलेनगर येथील कार्यालयात खासगी वाहनांच्या मालकांना न विचारता गाड्यांवर रेडियम लावून अधिकचे पैसे उकळले जात असल्याचे समोर आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व प्रकारच्या प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना विशिष्ट रंगाचे रेडियम (रिफ्लेक्टिव्ह टेप्स) बसविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रिफ्लेक्टर्स आणि मागील बाजूस रियर मार्गिंक टेपही आवश्यक आहे. व्यावसायिक वाहनांना सरकारने नेमलेल्या कंपनीचे टेप्स बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच्या किंमतीही निश्चित करण्यात आल्या आहेत. खासगी वाहनांना तसे नाही. वाहनाची पुनर्नोंदणी किंवा फिटनेस तपासणी करतानाही इतर तांत्रिक बाबींप्रमाणेच नियमानुसार व्यावसायिक वाहनांना रेडियम आहे किंवा नाही, हेही पाहिले जाते. रेडियम नसल्यास फिटनेस प्रमाणपत्र दिले जात नाही.

आरटीओच्या फुलेनगर येथील कार्यालयात हलक्या वाहनांची फिटनेस तपासणी केली जाते. ज्या वाहनांना रेडियम नाही, त्या वाहनांना येथील एक व्यक्ती परस्पर रेडियम बसवून थेट २०० रुपयांची मागणी करत असल्याचे आढळून आले आहे. प्रत्यक्षात खासगी वाहनांना रेडियम लावणे बंधनकारक नाही. पण तरीदेखील ही व्यक्ती आलेल्या वाहनांना रेडियम लावून २०० रुपये उकळत होती ‘सीविक मिरर’च्या प्रतिनिधीनेच या लुटीचा अनुभव घेतला. बुधवारी (दि. २९) सकाळी फुलेनगर येथील कार्यालयात पुनर्नोंदणीसाठी कार नेली होती. याबाबतची प्रक्रिया सुरू असतानाच गळ्यात रेडियम टेपच्या पट्ट्या टाकलेली एक व्यक्ती कोणतीही विचारपूस न करता थेट कारवर रेडियम बसवू लागली. 

त्या व्यक्तीला याबाबत विचारले असताना रेडियम बसविणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. बोलणे होईपर्यंत तिने रेडियम बसविलेही होते. त्यानंतर लगेच २०० रुपयांची मागणी करण्यात आली. ही रेडियमची किंमत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. २०० रुपयांची पावती मागितली असता, ‘‘पावती मिळणार नाही,’’ असे उत्तर मिळाले. मग त्याला ऑनलाईन पैसे पाठविले. त्यानंतर आरटीओ कार्यालयात याबाबत विचारणा केली असता अशा कोणत्याही व्यक्तीला रेडियम बसविण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

याबाबत ‘सीविक मिरर’ प्रतिनिधीने कार्यालयात असलेल्या मोटार वाहन निरीक्षकांकडे तक्रार केली. संबंधित व्यक्ती जबरदस्तीने वाहनांना रेडियम लावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी त्याला बोलावून घेत चांगलेच धारेवर धरले. ‘‘वाहनमालकांना रेडियमसाठी जबरदस्ती करू नये. रेडियम बसवायचे आहे किंवा नाही, अशी विचारणा करूनच बसवावे, अवाजवी पैसे घेऊ नये,’’ असे मोटार वाहन निरीक्षकांनी त्याला बजावले. वाहन निरीक्षकांनी सांगितले की, ‘‘रेडियम आरटीओकडून बसवून दिले जात नाही. खासगी वाहनांना बंधकारकही नाही. वाहनमालक त्यांच्या सोयीनुसार कुठूनही हे बसवून घेऊ शकतात. पण ते नियमानुसार असले पाहिजेत. येथील विक्रेत्याकडूनही बसवायला हरकत नाही. पण त्यांच्याकडून अशी जबरदस्ती योग्य नाही.’’

याविषयी बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, ‘‘रेडियम बसविणे केवळ व्यावसायिक वाहनांनाच बंधनकारक आहे. खासगी वाहनांना रेडियम बसविले जात नाही. व्यावसायिक वाहनांनाही वाहनमालकच रेडियम बसवितात. आरटीओकडून दिले जात नाही. तिथे जर कोणी जबरदस्तीने रेडियम लावत असेल तर ते योग्य नाही. याबाबत माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल.’’

दरम्यान, आरटीओच्या आवारातच वाहन मालकांची लूट होत असूनही तेथील अधिकारी काहीही कारवाई करत नसल्याचेही दिसून आले. त्यांच्या समोरच ही व्यक्ती वाहन मालकांकडूनच पैसे उकळत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळून आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story