RTO is stronger than police पोलिसांपेक्षा आरटीओ जोरकस

हेल्मेटसक्तीला पुणेकरांची नेहमीच ना असते. तसे तर कायद्यानुसार दुचाकी चालक आणि मागे बसलेल्यानेही हेल्मेट घालणे आवश्यक आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून काही वेळा या नियमावर बोट ठेवून मोठी दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली होती. पुणेकरांनी प्रत्येक वेळी ही कारवाई हाणून पाडली. त्यामुळे पोलिसांकडून सध्यातरी रस्त्यावर प्रत्यक्ष कारवाई होत नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 12:45 pm
पोलिसांपेक्षा आरटीओ जोरकस

RTO is stronger than police पोलिसांपेक्षा आरटीओ जोरकस

प्रादेशिक परिवहनची ७५० वाहनचालकांवर कारवाई; पोलिसांचा आकडा फक्त ३२

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

हेल्मेटसक्तीला पुणेकरांची नेहमीच ना असते. तसे तर कायद्यानुसार दुचाकी चालक आणि मागे बसलेल्यानेही हेल्मेट घालणे आवश्यक आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून काही वेळा या नियमावर बोट ठेवून मोठी दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली होती. पुणेकरांनी प्रत्येक वेळी ही कारवाई हाणून पाडली. त्यामुळे पोलिसांकडून सध्यातरी रस्त्यावर प्रत्यक्ष कारवाई होत नाही. जी कारवाई होते ती सीसीटीव्हीद्वारे. एकीकडे पोलिसांनी तलवार म्यान केलेली असताना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मात्र हेल्मेटसाठी दंडुका उगारला आहे. मागील काही दिवसांत आरटीओच्या पथकांनी शहरासह उपनगरांमध्ये ७५० हून अधिक वाहनचालकांवर हेल्मेटची कारवाई केली आहे. या काळात पोलिसांनी प्रत्यक्ष रस्त्यावर केलेली कारवाई फक्त ३२ एवढी आहे.

शहरातील अपघातांमध्ये हेल्मेट नसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. डोक्याला जबर मार लागून मृत्यू झालेल्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पोलीस तसेच आरटीओकडूनही सांगितले जाते. त्यामुळे या यंत्रणांकडून सातत्याने हेल्मेटचा वापर वाढवण्यासाठी वाहनचालकांना आवाहन केले जात आहे. आरटीओकडून सध्या शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे हेल्मेटबाबत प्रबोधन केले जात आहे. कार्यालयाच्या आवारात येताना या कर्मचाऱ्यांना हेल्मेट असणे सक्तीचे केले जाणार आहे. त्यासाठी आरटीओचे अधिकारी प्रत्येक कार्यालयात जाऊन आवाहन करत आहेत. हे प्रबोधन संपल्यानंतर प्रत्येक कार्यालयात दुचाकीवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती केली जाणार आहे. अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे आरटीओ अजित शिंदे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे आरटीओकडून शहरातील अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईला सुरुवात केली आहे. प्रामुख्याने उपनगरांमध्ये अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ही कारवाई केली जात आहे. मार्च महिन्यात २३ दिवसांमध्ये तीन हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवरील कारवाई सर्वाधिक आहे. हा आकडा ७५२ एवढा असून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आरटीओकडून इतर नियमांवर बोट ठेवतही कारवाईचा धडाका सुरू केला आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर, विरुध्द दिशेने वाहन दामटणे, ट्रिपल सीट इत्यादी नियमांचे भंग करणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जात आहे.

वाहतूक पोलिसांकडून मात्र रस्त्यावर हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांवर कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष होणारी कारवाई अत्यंत दुर्मीळ झाली आहे. वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक (नियोजन) अर्जुन बोत्रे यांनी केवळ सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच कारवाई होत असल्याचे स्पष्ट केले आहे. मार्च महिन्यात २४ तारखेपर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर कर्मचाऱ्यांनी केवळ ३२ दुचाकीस्वारांना दंड केला आहे. त्यासाठी १६ जणांनी दंड भरलेला नाही, तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून १३ हजारांहून अधिक वाहनचालकांना दंड ठोठावला आहे. त्यातही केवळ २९५ जणांनीच दंडाची रक्कम भरली आहे. एकूण कारवाई १३ हजार ४०१ एवढी असली तरी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कर्मचारी कारवाई करत नाहीत. ही जागा आता आरटीओने घेतल्याचे दिसते.

याविषयी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, रस्ते अपघातांच्या तुलनात्मक अभ्यासामध्ये दुचाकी व पादचाऱ्यांशी संबंधित अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. अशा ठिकाणांची माहिती घेऊन त्या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने सध्या कारवाईही केली जात आहे. मार्च महिन्यात केलेली कारवाई प्रामुख्याने हडपसर, लोणीकंद, लोणी 

काळभोर, विमानतळ, वारजे, सिंहगड रस्ता या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आहे. त्यासाठी चार पथके नेमण्यात आली आहेत. ही कारवाई यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असून अपघात कमी व्हावेत, हाच त्यामागचा उद्देश आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story