“रॉकस्टार मोमेंट”, पुण्यातील शो’वर ए. आर. रहमानची पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील राजाबहादुर मिल परिसरात रविवारी (३० एप्रिल) रात्री प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या शो’चे आयोजन आले होते. मात्र, १० वाजल्यानंतरही ए. आर. रहमान यांचा हा गाण्याचा कार्यक्रम सुरूच करण्यात असल्याने पुणे पोलिसांनी तो बंद पाडला होता. यावर ए. आर. रहमान यांनी “रॉकस्टार मोमेंट” असे म्हणत अखेर प्रतिक्रिया दिली आहे.
ए. आर. रहमान यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. इतकेच नाही तर पुणे पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारीही कुटुंबीयांसह या कार्यक्रमाला हजर होते. परंतु १० वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरूच ठेवल्याने चक्क स्टेजवर जाऊन पुणे पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर ए. आर. रहमान स्टेजच्या पाठीमागे निघून गेले.
यावर अखेर रहमान यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “काल आपण सर्वांनी स्टेजवर “रॉकस्टार मोमेंट” अनुभवला होता का ? मला वाटते की हो आपण तो क्षण अनुभवला. प्रेक्षकाचा प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे. हा रोलर कोस्टर कॉन्सर्ट होता. आम्ही लवकरच तुमच्या समोर गाणे गण्यासाठी परत येऊ!”