मैत्रिणीच्या जामिनासाठी लूटमार आणि खून

लिव्ह इन रिलेशनशीपमधील विवाहित मैत्रिणीला कारागृहातून सोडवण्यासाठी अल्पवयीन सराईत गुन्हेगाराने ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून लूटमार केल्याचा प्रकार पिंपरी पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Wed, 9 Aug 2023
  • 01:44 pm

मैत्रिणीच्या जामिनासाठी लूटमार आणि खून

'लिव्ह इन' मधील मैत्रिणीला कारागृहातून सोडवण्यासाठी वृद्धेचा खून

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

लिव्ह इन रिलेशनशीपमधील विवाहित मैत्रिणीला कारागृहातून सोडवण्यासाठी अल्पवयीन सराईत गुन्हेगाराने ८५ वर्षीय वृद्धेचा खून करून लूटमार केल्याचा प्रकार पिंपरी पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

विशेष म्हणजे आज (९ ऑगस्ट) या सराईत गुन्हेगाराच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होत असून तो गेल्या काही वर्षांपासून एका विवाहित मैत्रिणीबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होता. परंतु, खुनी हल्ल्याच्या प्रयत्नात त्याची ही मैत्रीण कारागृहात गेली. त्यामुळे तिचा जामीन करून घेण्यासाठी आवश्यक खर्च भागवण्याकरिता त्याने शालुबाई रुपाजी साळवे (वय ८५, रा. सॅनेटरी चाळ, पिंपरी) यांचा खून केला आहे. या प्रकरणी साळवे यांची नात सुनीता भीमराव कांबळे (वय ४८, रा. पिंपळेगुरव) यांनी शनिवारी (५ ऑगस्ट) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तर या प्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन सराईताला ताब्यात घेण्यात आले आहे. पिंपरीतील सॅनेटरी चाळ येथे ३१ जुलै रोजी ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर तब्बल आठवडाभराने पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

३० जुलै रात्री साडेदहा ते ३१ जुलै सकाळी साडेदहाच्या दरम्यान सॅनिटरी चाळ, येथे साळवे यांचा खून झाल्याचे उघड झाले होते. साळवे यांच्या घराच्या छताचे सिमेंटचे पत्रे तोडून ताब्यात घेण्यात आलेला चोरटा आत शिरला होता. घराला लागून असलेल्या बाथरूमच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या ड्रमवर उतरून त्याने छतावरून घरात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने साळवे यांचा गळा दाबून आणि त्यांच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करून खून केला होता. त्यानंतर त्याने साळवे यांच्या अंगावरील दागिने, घरातील दागिने, रोख रक्कम, साळवे यांचा एक मोबाईल आणि गॅस सिलिंडर घेऊन निघून गेला होता. साळवे यांनी घराच्या लोखंडी दाराला कुलूप लावले होते. हे कुलूप तोडून आरोपी पसार झाला होता. साळवे यांच्या पतीचे यापूर्वी निधन झाले आहे. साळवे दाम्पत्य पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला होते. साळवे या १९९९-२००० साली निवृत्त झाल्या आहेत. त्यानंतर त्या सॅनिटरी चाळ येथे एकट्याच राहात होत्या, तर त्यांची मुलगी-जावई आणि अन्य कुटुंब शहरात विविध भागात राहतात.

कुटुंबीयांनी साळवे यांच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी घरात पाहणी केली तेव्हा, त्यांच्याकडे असलेले काही पैसे आणि दागिने घरात नसल्याचे उघड झाले. दरम्यान, पिंपरी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे फौजदार अनिरुद्ध सावर्डे, फौजदार शाकीर जिनेडी आणि पथकाने आरोपींची धरपकड सुरू केली होती. परंतु, ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आलेल्यांनी गुन्हा केला नसल्याने त्यांना सोडण्यात आले. यावेळी एक सराईत अल्पवयीन आरोपी या घटनेपासून पिंपरी परिसरातून गायब झाल्याचे पोलिसांना समजले होते. तसेच तो सोमवारी (७ ऑगस्ट) सायंकाळी उशिरा अंधारात घराजवळ येत असल्याचे समजल्याने त्याला पकडण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन सराईतावर खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, लूटमार, चोरी, अवैध शस्त्र बाळगण्याचे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. फौजदार सावर्डे, जिनेडी, कर्मचारी राजेंद्र बारशिंगे, शांताराम हांडे, अविनाश कदम, वसंत बेंदरकर आदींसह पथकाने ही कामगिरी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story